मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट निर्माण झाले आहेत. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ठाकरे गटासोबतच्या युतीबाबत वक्तव्य केले आहे. ”काँग्रेस-शिवसेना ठाकरे गटाला आम्ही युतीसाठी ऑफर दिली होती. परंतु अधिकृतरित्या दोन्ही पक्षांकडून आम्हाला अद्याप काहीही कळवण्यात आलं नाही”, असे ऍड. आंबेडकर यांनी सांगितले.
मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ”आमची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस-शिवसेना ठाकरे गटाला आम्ही युतीसाठी ऑफर दिली होती. मात्र, अधिकृतरित्या दोन्ही पक्षांकडून आम्हाला अद्याप काहीही कळवण्यात आलं नाही. उद्धव ठाकरेंसोबत जो कार्यक्रम झाला तो अराजकीय होता. आम्हाला सोबत घ्यायचं की नाही ते त्यांनी ठरवावं.”
दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुका कशा लढायच्या याची तयारी करून घेतली. सर्व तालुकाध्यक्षांना मुंबईत बोलावलं. 50 टक्क्यांपेक्षा जास्त सरपंचपदाच्या जागा लढवल्या जातील, असेही ते म्हणाले.