सातारा | शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगडावर होणाऱ्या सोहळ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार की नाही याची चर्चा सुरू होती. मात्र, उदयनराजे प्रतापगडावर येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगडावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थिती दर्शवणार आहेत. मात्र, खासदार उदयनराजे भोसले गैरहजर राहणार आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात नाराजीचा सूर पसरला आहे.
दरम्यान, ३ डिसेंबरला रायगडावर होणाऱ्या आंदोलनाची चर्चा उदयनराजे आज कार्यकर्त्यांशी करणार आहेत. त्यामुळे ते प्रतापगडावर उपस्थित राहू शकणार नाहीत असे सांगण्यात आले आहे. आज होणाऱ्या प्रतापगडावरील सोहळ्यासाठी उदयनराजे यांनी उपस्थिती लावणे हे स्वत: मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. उदयनराजे हे शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. ज्या प्रतापगडावर हा सोहळा होत आहे, त्यावर उदयनराजे यांचे नियंत्रण आहे. म्हणून त्यांची उपस्थिती ही राज्यसरकारसाठी महत्त्वपूर्ण आहे. ते सहभागी व्हावेत यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रयत्न सुरू होते. मात्र उदयनराजेंनी त्याला प्रतिसाद दिलेला नाही. उदयनराजे हे सध्या साताऱ्यात आहेत म्हणून ते कार्यक्रमासाठी येणार नाहीत.