पुणे : दहीहंडीच्या निमित्ताने अमृता फडणवीस पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सत्ता स्थापनेपूर्वीचे किस्से पुन्हा एकदा समोर आणले. त्यावेळी त्या म्हणाल्या देवेंद्रजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला जात होते, असं मी म्हटलेलं नाही, ते टोपी, गॉगल, मास्क घालून कोणाला भेटायला जायचे, हे माहिती नाही. मी असं नाही म्हटलं की ते एकनाथ शिंदे यांना भेटायला जात होते. मी असं म्हटलं की ते टोपी घालून, गॉगल मास्क लावून बाहेर जायचे, मला नाही माहिती की ते कुणाला भेटायला जात होते, अजित पवारांना, एकनाथ शिंदेंना की अशोक चव्हाणांना ते त्यांनाच माहीत होते, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक ‘बॉम्ब’ फोडले.
तो गनिमी कावा होता, असं म्हणत अमृतांनी फडणवीस-अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या विषयालाही हात घातला. पहाटेच्या शपथविधीबद्दल ज्यांची पुस्तके येणार आहेत त्यात ही माहिती कळेल, असं अमृता म्हणाल्या. पहाटेच्या शपथविधीवर कोण लिहिणार आहे, असं पत्रकारांनी विचारताच देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार लिहितील, त्यांच्या जीवनात खूप काही आहे लिहिण्यासारखं, असं उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं.
जर आपण फॅमिली वाद दूर ठेवला, तर एकनाथ शिंदे यांच्यातच शिवसेना पुढे नेण्याचं उत्तरदायित्व होतं, आणि आता ते नेत आहेत, असंही अमृता म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेवरुन छेडलं असता, ‘ज्या दिवशी ते विरोधीपक्ष नेता झाले, तेव्हा ते पुन्हा आलेलेच होते, पुन्हा कशासाठी यायचं होतं, तुमच्या सेवेसाठी, तर ते पुन्हा आलेले आहेत, पुढच्याच दिवशी’ असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं.