नवी दिल्ली | येणाऱ्या नवीन वर्षाच्या म्हणजेच २०२३ च्या सुरुवातीला वाहन कंपन्यांकडून वाहनांच्या किमती वाढवण्याचे संकेत देण्यात आले आहे. यामध्ये मोठमोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. मर्सिडीज बेंझ, ऑडी, रेनॉ, किया इंडिया आणि एमजी मोटर यांनी येत्या जानेवारीपासून वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
वाहन निर्मितीसाठी आवश्यक कच्या मालाच्या वाढत्या किमती आणि निर्मितीच्या विविध टप्प्यांवर वाढलेला सामग्री खर्च पाहता वाहन कंपन्यांनी नवीन वर्षांत भाववाढ अपरिहार्य ठरल्याचे समर्थन केले. नुकतेच रिझव्ह बँकेने रेपो दरात ०.३५ टक्क्यांची वाढ केल्याने वाहन कर्ज आणखी महागणार असल्याने त्याचा वाहन विक्रीवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
देशातील सर्वांत मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने येणाऱ्या वर्षाच्या सुरुवातीला वाढ होणार असे जाहीर केले मात्र या नेमकी किती वाढ करण्यात येईल याबाबत खुलासा केलेला नाही. तर टाटा मोटर्सनेदेखील गेल्या महिन्यात टाटा नेक्सॉनच्या किमतीत १८,००० रुपयांची वाढ केली आहे.
दरम्यान, ऑडी इंडियाने सर्व प्रकारांतील वाहनांच्या किमती १.७ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला, तर मर्सिडीज बेंझ इंडियाने सर्व श्रेणीतील वाहनांच्या किमतीत १ जानेवारीपासून ५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. किया इंडिया विविध वाहनांवर जास्तीत जास्त ५०,००० रुपयांपर्यंत वाढ करणार आहे. एमजी मोटर इंडियाने विविध श्रेणींतील वाहनांच्या किमती दोन-तीन टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा मानस असल्याचे स्पष्ट केले. तर रेनाने मात्र वाहनांच्या किमती किती वाढविणार याबाबत अद्याप खुलासा केलेला नाही.