मुंबई | वांद्रे पूर्व येथील खेरवाडी पोलीस ठाण्यात सिलेंडरचा भीषण स्फोट (Cylinder Blast) झाला. या स्फोटात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या पोलिसांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
खेरवाडी पोलीस ठाण्याच्या स्टोअर्स रूममध्ये हा गॅस सिलेंडर ठेवण्यात आला होता. अवैधरित्या उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. अशाच एका खाद्यपदार्थ गाड्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर हे साहित्य जप्त करण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंपैकी एक सिलेंडर खेरवाडी पोलीस ठाण्यातील स्टोअर्स रूममध्ये ठेवण्यात आला होता. याच सिलेंडरचा आज दुपारच्या सुमारास स्फोट झाला.
या स्फोटात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार केले जात आहे.