कोची | भारतात नव्हे तर संपूर्ण जगात ज्याची जादू आहे, त्या आयपीएलचा लिलाव येत्या 23 डिसेंबरला होणार आहे. हा लिलाव केरळमधील कोची येथे होत असून, या लिलावात तब्बल ४०५ खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. इंग्लंडने नुकताच टी-२० विश्वकरंडक जिंकला असून, या संघातील बेन स्टोक्स, सॅम करन, ख्रिस जॉर्डन यांचाही लिलावात समावेश आहे. बेन स्टोक्सची बोली 2 कोटी लावण्यात आली आहे.
स्टोक्स, करन, जॉर्डन या विश्वविजेत्या खेळाडूंसह कॅमरून ग्रीन या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूंवर कोट्यवधी बोली लागण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या लिलावात ४०५ खेळाडू असणार आहेत. यापैकी २७३ खेळाडू हे भारतीय असतील. तसेच १३२ खेळाडू हे परदेशी असणार आहेत. शिवाय चार खेळाडू संलग्न देशातील असणार आहेत. यापैकी ११९ खेळाडू हे देशासाठी खेळलेले आहेत. २८२ खेळाडूंनी अद्याप देशाचे प्रतिनिधित्व केलेले नाही. ८७ खेळाडूंच्या जागा भरायच्या असून यापैकी ३० परदेशी खेळाडूंसाठी असणार आहेत.
परदेशी खेळाडूंवर सर्वाधिक बोलीची शक्यता आहे. १९ खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी इतकी असेल. त्यामुळे सर्वाधिक बोली याच खेळाडूंवर लावण्यात येण्याची शक्यता आहे. दीड कोटी मूळ किंमत असलेले ११ खेळाडू आहेत. पण मनीष पांडे, मयंक अग्रवालची मूळ किंमत एक कोटी आहे. असे २० खेळाडू आहेत. अजिंक्य रहाणेला गेल्या काही काळापासून सुमार फॉर्ममधून जावे लागत आहे. त्यामुळे आयपीएलच्या लिलावातही त्याची मूळ किंमत ५० लाख इतकीच ठेवण्यात आली आहे. त्याच्यावर बोली लागण्याची शक्यता कमी आहे.
मूळ बोली रक्कम दोन कोटी असलेले खेळाडू कोणते?
रायली रोसो, केन विल्यमसन, सॅम करन, कॅमरुन ग्रीन, जेसन होल्डर, बेन स्टोक्स, टॉम बँटन, निकोलस पुरन, फिल सॉल्ट, ख्रिस जॉर्डन, ॲडम मिल्न, अदिल रशीद, ट्रेव्हीस हेड, रॅसी वॅन डर ड्युसेन, जेम्स निशाम, ख्रिस लीन, जॅमी ओव्हर्टन, क्रेग ओव्हर्टन, तायमल मिल्स.