पुणे : पुण्यातील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस बळजबरीने शेतात ओढून नेत, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील आहे. बेलवाडी ता. इंदापुर येथे ही घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून वालचंदनगर पोलीस ठाण्यात आरोपी राहुल हनुमंत जाधव (रा-बेलवाडी) यासह इतर दोन व्यक्ती यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 20 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मौजे बेलवाडी ता. इंदापूर येथील मक्याचे शेतात ही घटना घडली.
आरोपी राहुल जाधव याने पीडित मुलीला जबरदस्तीने मक्याच्या शेतात ओढत नेत अत्याचार केला. काही वेळाने तेथे ओमनी गाडीतून तोंडाला रुमाल बांधलेले दोन व्यक्ती आले व त्यातील एकाने मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. यानंतर आरोपींनी तिला गाडीत बसवून बेलवाडी बसस्थानकावर सोडल्याचे मुलीने सांगितले. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत आरोपी राहूल जाधव यास अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जी. पी. इंगळे हे करीत आहे.