मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. शिवसेना सोडण्याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काय म्हटले, याची आठवण राज ठाकरे यांनी सांगितली.
राज ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडावर भाष्य करताना छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्या बंडासोबत माझ्या त्या निर्णयाशी तुलना करू नका असे राज ठाकरे यांनी सांगितले. छगन भुजबळ, नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत दुसऱ्या पक्षात सामिल झाले. मात्र, मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगून मी बाहेर पडलो असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा प्रसंग राज ठाकरे यांनी सांगितला. बाळासाहेब ठाकरे यांना कळलं की मी आता शिवसेनेत राहणार नाही. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांसोबतच्या शेवटच्या भेटीचा प्रसंग सांगितला. शिवसेना सोडण्याआधी मला त्यांनी भेटण्यासाठी बोलावलं होतं. मनोहर जोशी यांच्यासोबत त्यांची बैठक संपल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले. खोली गेल्यानंतर त्यांनी मला मिठी मारली आणि आता जा, असे म्हणाले. मी पक्ष सोडतोय हे त्यांना कळलं होतं. मी दगाफटका करून, पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलो नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. तुम्हा कार्यकर्त्यांच्या बळावर नवीन पक्ष स्थापन केला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरेंनी टोलच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला. मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा आरोप चुकीचा आहे. मनसे कुठलंही आंदोलन अपूर्ण सोडत नाही. टोलमुक्तीचे आश्वासन शिवसेना-भाजपचं होतं. मात्र, याबाबत आंदोलन मात्र मनसेनी केलं. शिवसेना-भाजपला कोणी प्रश्न का विचारत नाही? या टोलचा पैसा कुठे जातो हा मूळ प्रश्न होता, मात्र हे टोलबाबतच्या प्रश्नांची उत्तरं कोणत्याच सरकारने दिली नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. मनसे आतापर्यंत इतर पक्षांपेक्षाही सर्वाधिक आंदोलन केले असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.