मुंबई | महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन सत्ताधारी व विरोधी पक्षातील आरोप-प्रत्यारोपांमुळे चांगलेच गाजत आहे. प्रत्येक दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यावर खोचक टिका करत व घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत करतात. विरोधक अधिवेशन काळात रोज नवनवीन घोषणा देत आहेत. त्यामुळे आज ते काय घोषणा देणार याकडे सर्वांचे लक्ष होते. आज चौथ्या दिवशी देखील विरोधकांनी घोषणाबाजी करत विधानभवन दणाणून सोडले. विरोधकांनी ५०-५० बिस्किटचे पुडे दाखवत ‘फिफ्टी-फिफ्टी, चलो गुवाहाटी’ अशा अनोख्या पद्धतीने घोषणा दिल्या.
आज सर्व विरोधक चक्क बिस्किटचे पुडे हातात घेत घोषणाबाजी करताना दिसले. यावेळी ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी करण्यात आली. याआधी विरोधकांनी ‘आले रे आले गद्दार आले’, ‘विकास कामांना स्थगिती देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘५० खोके ५० खोके, खाऊन खाऊन , माजलेत बोके’, ‘ईडी सरकार हाय, हाय, , सीबीआय सरकार हाय, हाय’ अशा अनेक घोषणा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे सत्ताधारी सभागृहात येत असतानाच या घोषणा देण्यात येत असतात. एकनाथ शिंदे यांनाही त्याचा अनुभव आला आहे. त्यांनी तोडीस तोड उत्तर द्या असे आदेश दिले होते पण शिंदे गट मात्र अजुन कुठेही प्रभाव टाकू शकला नाही.