कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयितांवरील आरोप निश्चितीबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आज कोल्हापूर न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये हत्या प्रकरणातील संशयित न्यायालयात हजर होते. या प्रकरणी आत 6 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. पुढील सुनावणीवेळी एटीएस आणि एसआयटी या दोन्ही यंत्रणांच्या तपास अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास आता महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून करण्यात येणार आहे. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने या प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रे दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवली आहेत.
कोल्हापूरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर मॉर्निंग वॉक दरम्यान 16 फेब्रुवारी 2015 रोजी गोळ्या झाडण्यात आलेल्या. उपचार सुरू असताना काही दिवसांनी कॉम्रेड पानसरे यांचे निधन झाले. कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीच्या विशेष पथकाकडून सुरू होता.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाला हत्येला सात वर्षे उलटूनही कोणतीही मोठी प्रगती करता आली नाही. त्यानंतर हा तपास एटीएसकडे सोपवण्यासाठी पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तपास एटीएसकडे सोपवण्याचे आदेश दिले. न्यायाधीश रेवती मोहिते डेरे आणि न्यायाधीश शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने हा तपास वर्ग करण्याचे आदेश दिले होते. दहशतवादविरोधी पथकाला एसआयटीतील काही अधिकारी तपासात सहकार्य करणार आहेत.
एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची कागदपत्रे सीआयडीकडून मिळाली आहेत. या हत्येचा तपास एटीएसच्या पुणे शाखेकडून करण्यात येणार आहे. या प्रकरणातील शूटरला अटक करण्यावर लक्ष केंद्रीत येणार असल्याचे एटीएसने सांगितले. कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. तर, दोन मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत.