पुणे | गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार अखेर आज सायंकाळी ६ वाजता बंद होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते आणि इतर प्रमुख नेतेमंडळी देखील या प्रचारात सक्रीय झाले आहेत.
येत्या २६ फेब्रुवारीला ही पोटनिवडणुक पार पडणार आहे. त्यामध्ये पुण्यात मुख्यमंत्री यांचा रोड शो होणार आहे. याची सुरुवात समता भूमी पासून होणार आहे तर, लालमहाल येथे समारोप होणार आहे.
कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार सुरु आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्यासाठी भाजप तसंच महाविकासआघाडी जोर लावतेय शिवाय बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचाही जोरदार प्रचार सुरु आहे.
दरम्यान, भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि महायुती एकीकडे तर दुसरीकडे महाविकास आघाडी यांच्याकडून जोरदार प्रचार होत आहे. आज सायंकाळी ६ वाजेनंतर प्रचार पूर्णपणे बंद होणार आहे.