पुणे । पुण्यात कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे मतदान नुकतेच २६ फेब्रुवारीला पार पडले. याचा निकाल २ मार्चला लागणार आहे. परंतु निकाल जाहीर होण्याआधीच पुण्यात कसब्यातील मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी निकालाआधीच बॅनरबाजी सुरू केली आहे. यावर काही कारवाई होणार का हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झालं आहे. या मतदारसंघामध्ये एकूण 2,75,679 एवढे मतदार आहेत, यातल्या 1,38,018 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, यापैकी 74,218 पुरुष आणि 63,800 महिलांचा समावेश होता. दुसरीकडे चिंचवड विधानसभेमध्येही 50.47 टक्के मतदान झालं आहे.
दरम्यान, भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे कसबा पेठ आणि चिंचवड या विधानसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. याच जागांवर पोटनिवडणूक पार पडल्या.