रहिवाशी व माजी नगरसेवकांच्या तक्रारीनंतर त्वरित कारवाई
पुणे | बिल्डर युवराज ढमाले, विकी संघवी व इतरांनी मिळून कोढवामध्ये बांधलेल्या राजगृही बिझनेस हब कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्थेची इमारतीमधील बेकायदेशीर बांधकामावर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अखेर आज कारवाईचा हातोडा टाकला. आणि बेकायदेशीर बांधकाम काढण्यास सुरुवात केली.
बिल्डर युवराज ढमाले, विकी संघवी व इतर विकासकांनी ही राजगृही बिझनेस हब इमारत बांधली आहे. येथील रहिवाशांना पार्किंग वापरता येत नव्हते. आणि या पार्किंगच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावरील जागेत बिल्डर युवराज ढमाले यांनी बेकायदेशिरपणे जीम व हॉटेलचा व्यवसाय सुरू केला होता.
याप्रकरणी रहिवाशांकडून महापालिकेकडे व रेरामध्ये तक्रार करून देखील कारवाई झाली नव्हती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील, माजी नगरसेवक शंकर पवार, राहुल भंडारे, पिंटु धाडवे यांनी बिल्डर युवराज ढमाले यांनी बांधलेल्या इमारतीमधील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याची मागणी कालच (गुरुवारी) शहर मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली.
महापालिकेने तक्रारीची त्वरित दखल घेत आज कोंढवा बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 62/1/2/1 आणि 62/1/2/2 या जागेतील हा राजगृही इमारतीमधील बेकायदेशीर बांधकामावर हातोडा टाकत कायदेशीर कारवाई केली आहे.
बिल्डर युवराज ढमाले यांनी राजगृही बिझनेस हब कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्थेच्या इमारतीच्या समोर बांधलेल्या कमर्शियल इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर चारचाकी पार्किंगच्या जागेवर बेकायदेशीरपणे जिम सुरू केली आहे. तर, पाचव्या मजल्यावर दुचाकी पार्किंग असताना त्याजागी हॉटेल व्यवसाय सुरू केले होते.
याच प्रकल्पातील फ्लॅटधारकांना पार्किंग न मिळाल्यामुळे त्यांच्या गाड्या बाहेर लावाव्या लागतात. तसेच, या बेकायदेशीर व्यवसायामुळे त्रास होतो. हे लक्षात घेता ताबडतोब कारवाई होणे आवश्यक होते. म्हणूनच तुषार पाटील, शंकर पवार, राहुल भंडारे व पिंटू धाडवे यांनी शहर मुख्य अभियंता यांच्याकडे तक्रार दिली होती. त्याची तत्काळ दखल घेत आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली आहे. ही कारवाई दोन दिवस चालेल.