पुणे | पुण्यामध्ये युगल धर्म संघ गेल्या सोळा वर्षांपासून अनेक चांगले उपक्रम राबवित आहेत. या युगल धर्मामध्ये पती-पत्नी असे दोघेही जोडीदार एकत्र काम करत असतात. मात्र, केवळ जोडप्यांसाठीच नव्हे तर युवा पिढीसाठी युगल धर्म संघाने नुकतेच वाय.डी.एस युथ क्लब सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी २५ मार्चला युगल धर्म संघाचे अध्यक्ष विजय भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाय.डी.एस युथ क्लबमध्ये सहभागी झालेल्या शंभरहून अधिक युवकांचा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याठिकाणी पती-पत्नी असलेले जोडपं भरपूर उत्साहाने एकत्र काम करतात. यामागे केवळ नियमित संवाद आणि मनोरंजनच नाही तर बौद्धिक प्रगतीसाठी देखील प्रयत्न केले जातात. प्रत्येकाला एकसमान व्यासपीठ याठिकाणी दिले जाते. ज्यामध्ये लपलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देणे हा मुख्य हेतू आहे.
दरम्यान, वाय.डी.एस युथ क्लबचे उद्दिष्ट असे आहे की, युवा वर्गामध्ये जे कौशल्य आहे, क्षमता आहे, त्यांच्यातील नेतृत्वगुण आहे या सगळ्याला एक संधी द्यायची आणि त्यांचा वैयक्तिक उत्कर्ष कसा होईल, त्यांचं ज्ञान कसे वाढेल? त्यांच्यातील गुणवत्ता कशी वाढेल? त्यांचं नेटवर्क कसं वाढेल? त्यांच्यातील उद्योजगता कशी वाढेल? त्यांचा खेळ आणि त्यांच्यातील कलात्मकता कशी वाढेल? यासाठी हा वाय.डी.एस युथ क्लब काम करणार आहे.