पुणे | भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले आहे. राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी गिरीश बापट एक होते. त्यांना बुधवारी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यांवर घरीच उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यांवर डॉक्टरांनी उपचार सुरु केले होते परंतू उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
दरम्यान, गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट 1995 पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसेच्या मोहन जोशी यांना पराभव करत त्यांनी लोकसभा गाठली होती.