मुंबई | बार्टीची फेलोशिप मिळावी या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यातील एकूण ८६१ विद्यार्थी धरणे आंदोलन करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल आझाद मैदानात या विद्यार्थ्यांची भेट घेतली.
यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना, मी विद्यार्थ्यांना सांगितलं आहे, ओबीसी समाजाचे आमदार, खासदार आपली बाजू सरकारसमोर ठेवतात. पण, अनुसूचित जातीचे आमदार, खासदार हे करत नाहीत. त्यामुळे तुमचा प्रश्न सुटत नसेल तर या आमदार खासदारांना मारा, असं धक्कादायक विधान त्यांनी केलं आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना बार्टीची फेलोशीप हवी आहे. त्याबाबत माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. त्यांची लवकरच भेट घेणार असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. शिक्षणातून नवीन पिढी उभी राहते. त्यासाठी आंदोलन करावं लागणं दुर्दैवी आहे. इतर संस्थांच्या मागे निवडून दिलेले प्रतिनिधी उभे राहतात, त्यांना हाताखाली घेतल्याशिवाय विषय सुटणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.