मुंबई | आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे हे देखील ॲक्शन मोड मध्ये आलेले दिसत आहे.
राज ठाकरे यांनी नुकतीच मनसे पदाधिकारी मेळावा घेतला आणि त्यांच्या भाषणातून अनेक राजकारण्यांवर खोचक टिका केली.
याच मनसेच्या मेळाव्यात सदस्य नोंदणी सुरु करण्याची घोषणा देखील राज यांनी केली होती. त्यानुसार आजपासून मनसेच्या सदस्य नोंद सुरुवात होणार आहे.
पुण्यात आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा श्रीगणेशा होणार आहे. मनसेच्या पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात सकाळी या मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. या नोंदणीसाठी राज ठाकरेंनी नवीन घोषवाक्य जाहीर केलं आहे. ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’, असं मनसेचं नवं घोषवाक्य आहे. यावरुन मराठी माणसांच्या प्रश्नांसोबतच हिंदुत्वाच्या मुद्दयावर मनसे आक्रमक होणार असल्याचं दिसून येत. राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मोठी जबाबदारी सोपवत असल्याचे म्हटले होते. निवडणूक आयोगानुसार दर तीन-चार वर्षांनी पक्षाला सदस्य नोंदणी करावी लागते. यंदा मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी होणार आहे. शिवसेनेने देखील मोठ्या प्रमाणावर नवे सदस्यांना शिवबंधन बांधण्याची मोहीम सुरू केली आहे. आता मनसे देखील सदस्य नोंदणी अभियान सुरु करताना दिसत आहे.
लोकापर्यंत जास्त वेगाने पोहोचायला, जनसंपर्क वाढवायला, ग्राऊंड वर्क करण्यासाठी मनसेने देखील सदस्य नोंदणी अभियान सुरु केले आहे. दोन वर्षांनंतर महाराष्ट्रातील सण म्हणजे गणेशोत्सव, दसरा, नवरात्र, दिवाळी या काळात अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी एक मोहिम उघडली जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. गणेशोत्सवाच्या ठिकाणी, चौकात मनसेचे बॅनर, पोस्टर लागले पाहिजेत. ते कसे असावेत, काय व असावे हे तुम्हाला कळविले जाईल. परंतू, मला ते सर्वत्र दिसायला हवेत अशा सुचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राज ठाकरेंनी पक्षातील लोकांना अधिकच्या सुचना देत सोशल मीडियावर पक्षांतर्गत वाद, उणीदुणी पोस्ट करून नयेत असा दम भरला आहे. राज्यात दिवाळीनंतर कधीही निवडणुका लागू शकतात. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी मध्ये कधीही निवडणूका लागतील,त्यामुळे मनसे पक्ष ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ ही घोषणा देत सदस्य नोंदणी ला सुरूवात केली आहे.