रत्नागिरी | प्रख्यात अभिनेते भरत जाधव यांनी रत्नागिरी येथील नाट्यगृहात आपण पुन्हा पाय ठेवणार नाही, असे सांगत प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली. त्यावर आता पालकमंत्री उदय सामंत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. भरत जाधव यांनी या गोष्टीचे नाहक भांडवल केले, त्याचा इव्हेंट करायचा की एपिसोड करायचा, हा त्यांचा प्रश्न आहे, असा टोला देखील उदय सामंत यांनी त्यांना लगावला आहे.
विशेष म्हणजे उदय सामंत यांच्या पत्नी अभिनेत्री नीलम शिर्के या भरत जाधव यांच्या सहकलाकार होत्या. ‘साहेब, बिबी आणि मी’ या मालिकेत त्यांनी भरत जाधव यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
उदय सामंत बोलताना, मी इकडे येणार नाही, मी तिकडे येणार नाही, पण असं काही होत नाही आणि ते न आल्यामुळे सांस्कृतिक चळवळ काही थांबणार नाही” अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी भरत जाधव यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. एका आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी येथे बोलत होते.
ते म्हणाले की, सावरकर नाट्यगृहात कोणत्या त्रुटी असतील तर त्या नक्कीच दूर केल्या जातील. संयोजकांनी तीन तासाचे डिझेल टाकल्यानंतर ते चार तास पुरूच शकत नाही. भरत जाधव यांच्या नाटकाच्या आधी तीन दिवस मी त्याच ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांबरोबर कार्यक्रमासाठी होतो. त्यावेळेला एसीचा कोणताही त्रास आम्हाला झाला नाही, त्यामुळे आहे त्यापेक्षा उगाचच काहीतरी मोठे झाले आहे असं करून आविर्भाव आणत दाखवणं हे योग्य नाही’ अशा शब्दात उदय सामंत यांनी सुनावले आहे.
दरम्यान, मीही सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्ष काम करत आहे. भरत जाधव यांना असा इव्हेंट करण्याची आवश्यकता नव्हती. पण तो शेवटी त्यांचा प्रश्न आहे. या सगळ्याची दखल नक्की घेण्यात आली असून काही त्रुटी असल्यास त्या नक्कीच दूर केल्या जातील अशी ग्वाही देत भरत जाधव यांनी माफी मागताना मला वाटलं त्यांनी प्रेक्षकांच्या तिकिटाचे काही पैसे परत दिले असतील, असा टोलाही सामंतांनी लगावला आहे.