पुणे | भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील 2000 पेक्षा अधिक आमदार एकाच मंचावर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एकत्र जमणार आहेत. पुण्यातील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे मुंबईतील बीकेसी जिओ सेंटरमध्ये दि. 15 जून ते 17 जून पर्यंत राष्ट्रीय विधायक संमेलन आयोजित केले आहे.
राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मिकता व राष्ट्रीय सर्वांगीण शाश्वत विकास या मध्यवर्ती विचार त्रिसूत्रीचा उद्देश ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रीय विधायक संमेलनाचे प्रमुख संयोजक राहुल विश्वनाथ कराड यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.
यानिमित्ताने आपला पक्ष, वाद हे सर्व बाजूला सारून वेगवेगळ्या राज्यातील आमदारांचा एकमेकांमध्ये संवाद घडविणे, सुशासनाच्या मुद्द्यांवर आणि लोकशाहीला शक्तिशाली बनवणे, कल्याणकारी योजना, आर्थिक कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार, आपला मतदारसंघ विकसित करण्याची कला आणि कौशल्य, आदी विषयांवर या सर्व आमदारांची मार्गदर्शनपर चर्चा होणार आहे.
तसेच लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, शिवराज पाटील चाकूरकर, मनोहर जोशी तसेच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे सर्व या संमेलनाचे मार्गदर्शक आहेत. भारतातील सर्व विधानसभा व विधानपरिषदेचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहे.
याबरोबरच देशभरातील आमदारांचं हे ऐतिहासिक पहिलं राष्ट्रीय संमलेन महाराष्ट्राच्या राजधानीत व्हावं म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
दरम्यान, या तीन दिवसीय कार्यक्रमात प्रथम या संमेलनाचा उद्घाटन सोहळा 15 जूनला होईल तर समारोप सोहळा १७जूनला होणार आहे. या व्यतिरिक्त 40 समांतर सत्र आणि गोलमेज परिषद होणार आहे यामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची चर्चा, राजकारणाचे अध्यात्मिकीकरण, अमृत कालमध्ये भारताचे परिवर्तन, व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील लिडर्सची चर्चा, विधिमंडळाचे कामकाज, कायदा आणि नागरिक अशा अनेक चर्चादेखील यामध्ये होणार आहे. प्रत्येक सत्रामध्ये 50 आमदार चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक सत्राचे अध्यक्षपद विधानसभेचे सभापती, विधान परिषदेचे अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता हे भूषविणार आहेत.
यावेळी समन्वय समितीचे सदस्य योगेश पाटील, भाजप आमदार माधुरी मिसाळ, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.