बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी हा उपक्रम देशभर सुरु
पुणे | बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी उपयुक्त ठरलेला ‘गुड टच, बॅड टच’ हा उपक्रम महिला व बालकल्याण आणि शिक्षण विभागाने मिळून राज्यभर राबवावा, अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
युनिसेफ व ग्रॅव्हिटस फाउंडेशनतर्फे पुण्यातील आपटे रोडवरील हॉटेल रामी ग्रँड येथे ‘बालकल्याण, आरोग्य व त्यांचे अधिकार’ या विषयावर राउंड टेबल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. बाल न्याय अधिनियम आणि बालकांच्या सुरक्षिततेचे इतर कार्यक्रम मराठीमधून उपलब्ध करून देण्याची मोहीम हाती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बाल आरोग्य व विकास, बालकांची लेखन-वाचन क्षमता आणि पाणी व्यवस्थापनात युवकांचा सहभाग इत्यादी विषयांवर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. युनिसेफ आणि भारत सरकार यांच्यात बालकांचे आरोग्य, विकास, सुरक्षितता, शिक्षण याबाबत सामंजस्य करार झाला आहे. या करारांतर्गत बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी हा उपक्रम देशभर सुरु करण्यात आला आहे.
या परिषदेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, युनिसेफ महाराष्ट्र विभागाच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर, ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा उषा काकडे, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, दिग्दर्शिका फराह खान, ट्रान्सजेंडर ॲक्टीविस्ट लक्ष्मीनारायण त्रिपाठी, डॉ. पूजा बोरेले, अतिरिक्त पोलीस महासंचालक(कारागृह)चे अमिताभ गुप्ता, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. मेधा कुलकर्णी, कायद्याच्या अभ्यासक ऍड. दिव्या चव्हाण, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, बालनाट्य लेखक व दिग्दर्शक संजय हळदीकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. अमिता फडणीस, राज्याच्या महिला व बालकल्याण आयुक्तालयाचे उपायुक्त राहुल मोरे आदी मान्यवरांनी देखील यावेळी या विषयावर मार्गदर्शन केले.
बालकांची सुरक्षितता, त्यांचे आरोग्य, शिक्षण, अधिकार, त्याचबरोबर विशेष परिस्थितील मुले म्हणजे अनाथ मुले, शेतकऱ्यांची मुले अशा मुलांच्या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. बाहेरील वातावरण गंभीर असताना, हिंसाचार चाललेला असताना बालकांच्या प्रश्नांवर ही संस्था काम करतीय आणि बालकांच्या या प्रश्नांबाबत विधानपरिषदेत याला कशी चालना मिळेल या दृष्टीकोनातून मी विचार मांडणार आहे. महाराष्ट्रातल्या अशा संस्थाचं काम अजून मजबूत झाले पाहिजे ज्यातून मुलांना सुरक्षितता आणि जीवनाची संधी प्राप्त होईल.
- डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद
युनिसेफ व ग्रॅव्हिटस फाउंडेशन गेल्या तीन वर्षांपासून काम करत आहे. या विषयाबाबत चर्चा केली असता गंभीर आकडेवारी समोर आली मग त्यातून शाळांच्या गाठीभेटी घेऊन तिथले मुख्याध्यापक, शिक्षक यांची प्रथम याबाबत जागृती करावी लागली. त्यांनतर गुड टच बॅड टच या विषयावर 45 मिनिटांचे सेशन मुलांकरिता घेण्यात आले. तेव्हा मुलं मोकळेपणाने बोलू लागली संवाद करू लागली. एकूण 4 लाख विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहचलो आहोत. आणि याचा नक्कीच मुलांना फायदा होत आहे.
- उषा काकडे, संस्थापक अध्यक्षा, ग्रॅव्हिटस फाउंडेशन
जे बालकांचे अधिकार आहेत त्यावर आधारित हे कॉन्फरन्स आयोजित करण्यात आले आहे. जसे शिक्षणाचा अधिकार, जीवनात जगण्याचा अधिकार, पाणी पिण्याचा अधिकार, स्वच्छ वातावरणाचा अधिकार आणि सुरक्षिततेचा अधिकार हे सर्व अधिकार बालकांना फायदेशीर आहे. त्याचबरोबर मुलांचा शारीरिक विकास तर आपण पाहतोच परंतु त्यांच्या मानसिक विकासाकडे देखील लक्ष ठेवणे महत्वाचे आहे.
- राजेश्वरी चंद्रशेखर, महाराष्ट्र विभाग प्रमुख, युनिसेफ