बीड | राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना आज सकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांनतर आता आणखी एका मंत्र्याला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीच्या घरी धमकीचा फोन येऊन यामध्ये लाखो रुपयांची मागणीही करण्यात आली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांना फोनवरून धमकावल्याचं समोर येत आहे. तर 50 लाख रूपये द्या अन्यथा…, असं फोनवरील व्यक्ती बोलत आहे. मुंडे यांना आलेल्या धमकी प्रकरणी पोलिसात तक्रार केली जाईल, अशी माहिती आहे. मात्र सध्यातरी मुंडेंना धमकी आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी
मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्याच्या फोनवर धमकीचा फोन आला होता. या फोनवर भुजबळ यांना आपण जीवे मारणार आहोत. तशी सुपारी आपल्याला मिळाली आहे, असं तो तरूण सांगत होता.
भुजबळांच्या आलेल्या या धमकीनंतर आता पोलिसांकडून तपास केला जात आहे. या तपासात पुण्यातील एका तरूणाला पुणे पोलिसांकडून अटकही करण्यात आली आहे. तसंच भुजबळांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्यासोबत जाणाऱ्या नेत्यांमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव आघाडीवर होतं. अजित पवार यांनी जेव्हा 5 जुलैला समर्थक आमदारांची बैठक बोलावली होती. तेव्हा या बैठकी दरम्यान धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची बाजू खंबीरपणे मांडली.
दरम्यान, अजित पवार यांच्यावर कसा अन्याय झाला हे धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणातून पटवून देण्याचा प्रयत्न केला. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक अन्याय कुणावर झाला असेल तर तो अजितदादांवर… असं धनंजय मुंडे म्हणाले. त्यांच्या या दमदार भाषणाची महाराष्ट्रभर चर्चा झाली. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांना थेट धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.