मुंबई | खालापूरमधील इर्शाळवाडी गावात दरड कोसळली. यामध्ये संपूर्ण वाडी ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाचे बचावकार्य सुरु असून उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळपासून नियंत्रण कक्षात बसून या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.
अजित पवार यांनी मंत्रालयात लवकर येऊन थेट नियंत्रण कक्ष गाठलं. घटनास्थळी उपस्थित अधिकारी आणि नेत्यांशी ते सतत संपर्कात होते. यावेळी अजित पवारांनी तेथील अधिकाऱ्यांना सुनावल्याची देखील माहिती मिळत आहेत. तसा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
आज सकाळपासूनच एनडीआरएफचे चार पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही सकाळी घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी अजित पवार प्रांत अधिकाऱ्यांकडून मदतकार्याची माहिती घेत जखमी आणि मृतांची संख्या लिहून घेत होते.
गिरीश महाजन यांच्याशी ते बोलत असताना ज्यावेळी अधिकारी मुख्यमंत्री आले म्हणून खाली उतरत आहे, असे अजित पवारांना कळले, तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलच सुनावलं.
अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यातला संवाद
अजित पवार म्हणाले, “गिरीशजी, तुम्ही स्पॉटवर पोहोचलात का? कारण प्रांत पण स्पॉटवर आहेत. एनडीआरएफचे लोक आणि तुम्ही वर गेले आहात का, जिथे घटना घडली, प्रांत वगैरे तुमच्याजवळ आहेत का?.
त्यावर महाजन म्हटले “नाही…नाही ऐका ना… सीएम आलेत (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) शिंदे गडाच्या खाली आल्याचे कळल्यानंतर मदत कार्य करत असलेले अधिकारीही खाली आले. हे अजित पवार यांना फोनवरून कळले त्यावर अजित पवार म्हटले खाली जाण्याऐवजी तिथेच लोकांनी काम केलं पाहिजे ना? अहो जायला एक-दीड तास, वर यायला एक-दीड तास… त्यातच तीन तास गेले तर…आता कसं होणार?,” असं म्हणत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.