मुंबई | करोनाचे संकट दूर झाल्यामुळे शासनाने हटविलेल्या निर्बंधामुळे यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. विद्यार्थी व पालकांनी गावाला जाण्याचे नियोजन आहेत. यामुळे गणेशोत्सवात सर्व शाळा व कॉलेजांना पाच दिवस सुट्टी जाहीर करावी, तसेच या काळात कोणत्याही, परीक्षा अथवा प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येऊ नयेत, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. याबाबतची मागणी मनसे, युवासेनेने केली होती.
गणेशोत्सवासाठी ठाणे, मुंबई परिसरातील पालक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोकणासह राज्यातील अनेक भागांत गावी जात असतात. याच सुट्टीच्या काळात काही इंग्रजी शाळा परीक्षांचे आयोजन करतात अशा तक्रारी दरवर्षी पालकांच्या असतात. अनेकदा, शाळांना पाच दिवसांची सुट्टी दिली जाते. परंतु, परतीच्या प्रवासाला गर्दी होते त्यामुळे वेळेत पालकांना पोहचता येत नाही. या कालावधी परीक्षा घेऊ नये, उत्सवाचा संपूर्ण कालावधी सुट्टी द्यावी, अशी मागणी शिक्षण उपसंचालकांकडे युवासेना आणि मनसेने केली.
या मागणीनंतर शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी यासंदर्भात शाळांना सूचना द्याव्यात, असे आदेश शिक्षण निरीक्षक आणि शिक्षणाधिकारी यांना द्यावेत, असे आदेश दिले आहेत. याबाबत युवासेनेचे प्रदीप सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रमुख संघटक चेतन पेडणेकर यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता.
मुंबई अकरावी प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी सुरु झाली असून गुणवत्ता यादी ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर २ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेजांत जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा आहे. मात्र या कालावधीत गणेशोत्सव असल्याने ही प्रक्रिया आधी संपवावी किंवा गणेशोत्सवानंतर पूर्ण करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३० ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर २ सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. मात्र या कालावधीत राज्यात गणेशोत्सव असून अनेक ज्युनिअर कॉलेजांना पाच दिवसांच्या सुट्या आहेत. यामुळे ही प्रक्रिया गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावी किंवा त्यानंतर सुरू करावी, अशी मागणी मनसेचे विलेपार्ले विधानसभा विभाग अध्यक्ष सुधाकर तांबोळी यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली आहे. तर, यावर विचार करून वेळापत्रकात शक्य तो बदल करू, असे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर म्हणाले.