नवी दिल्ली | लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी भारताचं ऐतिहासिक जुनं संसद भवन आता ‘संविधान सदन’ म्हणून ओळखलं जाणार आहे अशी घोषणा केली. त्याचबरोबर या भवनात वापरण्यात येणाऱ्या काही संज्ञा देखील नव्या संसद भवनात वापरण्यात येणार आहेत.
बिर्ला बोलताना म्हणाले की, ज्या भवनात आपण जमलो होतो ते आता संविधान सदन म्हणून ओळखलं जाईल. त्याचबरोबर लोकसभेच्या कामकाजात वापरले जाणारे हाऊस, लॉबी आणि गॅलरीज हे शब्दही यापुढे नव्या भवनात जी भारताची संसद आहे तिथं वापरले जातील असं म्हटलं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसद भवनातील सेन्ट्रल हॉलमध्ये भाषण करताना, जर तुमची सर्वांची संमती असेल तर आपण नव्या संसद भवनात दाखल होताना जुन्या संसदेचं पावित्र्य कमी होता कामा नये, यासाठी जिथं संविधान सभेनं मोलाचं काम केलं त्या जुन्या संसद भवनाला ‘संविधान सदन’ म्हणून ओळखलं जावं अशी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, दोन्ही सभागृहातील विरोधीपक्ष नेते यांना सूचना केली होती.