मुंबई | राष्ट्रवादी महीला काँग्रेसच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या सरकारी शाळा खासगी कंपन्यांना चालवण्यासाठी देण्याच्या निर्णयावर कडाडून विरोध केला आहे. यामागचं कारण देखील त्यांनी यावेळी स्पष्ट करत यामध्ये मनमानी पद्धतीनं काम करण्याचे प्रकार वाढणार असल्याचं भाकीतही त्यांनी केलं.
त्याचबरोबर महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत हे आरक्षणाच्या निर्णयामुळे स्पष्ट झालं. दुसरीकडे मात्र मणिपूरसारखी घटना समोर येते त्यामुळं आपल्याला जागृत राहावं लागणार आहे. आता असा प्रकार घडत असले तर भगिनींना रस्त्यावर उतरावं लागेल याचे परिणाम झाले तर सरकार केस टाकतील, विविध कलम लावतील तुम्ही त्याची चिंता करू नका सरकार बदलत असतात त्या केसेस आपण काढून टाकू असं आवाहन देखील पवारांनी उपस्थित महिलांना केलं आहे.
तर ज्या शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत, त्या आता खासगी कंपनीला देण्यात येत आहेत. त्यांनी या शाळा सीएसआर खात्यातून चालवाव्यात, त्याच्यातून शाळेचा विकास करावा अशी त्यांची अपेक्षा आहे. पण आता जी कंपनी शाळा दत्तक घेईल त्या शाळेला कोणतं नाव द्यायचं याचा अधिकार त्यांना आहे. भविष्यात त्या कंपनीला शाळेच्या कारभारात हस्तक्षेप करायचा अधिकार आहे असे मत पवारांनी यावेळी व्यक्त केले आहे.
तसेच यामुळे शाळेची शासकीय मालमत्ता आणि उपयोग हा वैयक्तिक कारणासाठी होऊ शकेल. याचं उदाहरण देत नाशिकमधील एक शाळा मद्य तयार करणाऱ्या कंपनीनं दत्तक घेतली आहे. त्या शाळेमध्ये नुकताच गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता. असा आदर्श आम्ही मुलांसमोर ठेवणार आहोत? असा प्रश उपस्थित करत शासकीय शाळा खासगी कंपनीला द्यायचा सरकारचा जो निर्णय आहे, याला सुद्धा आपण विरोध केला पाहिजे, असं देखील पवारांनी म्हटलं. यावेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, रोहिणी खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.