पुणे | गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही एसआयटी हे नाव ऐकलं असेल…विधिमंडळात देखील एसआयटी स्थापन करण्यात येईल असं वारंवार म्हटलं जातं…पण एसआयटी म्हणजे नेमकं काय? एसआयटी स्थापन करण्याची गरज का भासते? हेच आपण जाणून घेऊ…
एसआयटी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजेच विशेष तपास पथक…जी सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमार्फत स्थापन केली जाते. वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, गुन्हे घडल्यास त्यांचा सखोल तपास करणे, आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणणे हे काम हे विशेष तपास पथक करत असतं.
जेव्हा एखाद्या गुन्ह्यात अनेक आरोप-प्रत्यारोप होत असेल किंवा नवनवीन घटना उघडकीस येत असेल तेव्हा सहसा सुप्रीम कोर्ट या टीमला गठित करतात. यामध्ये काही न्यायाधीश आणि काही विशेषतज्ञ असतात म्हणूनच याला विशेष पथक मानले जाते. मागील काही दिवसात अनेक प्रकरणात एसआयटी नेमली गेली मग त्यात मुंबईचे दिशा सालियन मृत्यू प्रकरण असो वा बीडच्या आमदारांची घरे जाळण्याचं प्रकरण…
एसआयटी तपासामध्ये कोणाची नेमणूक केली जाते हेदेखील पाहूयात…
यात ज्या जिल्हा /आयुक्तालय परिसरातील घटना असेल तेथील एक वरिष्ठ अधिकारी प्रमुख, जिल्ह्यात अॅडिशनल एस.पी. व आयुक्तालयात डी.सी.पी. (वचितप्रसंगी अॅडिशनल किवा जॉइंट सी.पी.) दर्जाचा अधिकारी देखरेखीसाठी प्रमुख असतो.
त्यांच्या हाताखाली एक डी.वाय.एस.पी. दर्जाचा अधिकारी दैनंदिन देखरेखीसाठी असतो त्यानंतर १ किंवा २ पोलिस निरीक्षक प्रत्यक्ष तपास किंवा चौकशीसाठी असतात…त्यांच्या मदतीला इतर काही कनिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी जे लिखाणकाम करतील असे सहकारी देण्यात येतात.
हे अधिकारी ज्या ठिकाणचा गुन्हा आहे त्याच जिल्ह्यातील असतात त्यांची एसआयटीत निवड करताना ही काळजी घेतली जाते. म्हणजे शक्यतो अपेक्षित अंतिम अहवाल देण्यात कोण उपयुक्त ठरेल हे पाहिले जाते.
एसआईटी पथकाचा तपास पूर्ण झाला की त्यांचा रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात येतो…जर एसआईटीचं गठन राज्य सरकारने केले असेल तर हा रिपोर्ट न्यायालय किंवा केंद्र सरकारला स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार असतो. सध्याच्या ज्या घडामोडी आपण पाहतो त्यामध्ये बऱ्याचदा एसआयटी स्थापन करण्यात येते..मागील काही दिवसांपूर्वीच एकाच दिवशी तीन एसआयटी पथकं स्थापन करण्यात आली होती.