20 जानेवारी पासून अंतरवाली सराटीतून सुरू झालेला मनोज जरांगेंचा मोर्चा 25 जानेवारीला नवी मुंबईत येऊन धडकला. सरकारच्या विनवणीनंतर मनोज जरांगेंनी आपला मोर्चा नवी मुंबईतील वाशीमध्ये थांबवला आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगेंनी सरकारला अधिकचा एक दिवस दिला. या एका दिवसात सरकारच्या शिष्टमंडळाच्या जरांगेंशी भेटी गाठी देखील झाल्या.सोबतच 27 जानेवारीच्या पहाटे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर सरकारचा निर्णय घेऊन जरांगेंच्या भेटीला आले.या जीआरमध्ये जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करत सरकारनं मराठा समाजाला दिलासा दिला.यावेळी 27 जानेवारीला मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेत आंदोलनाला स्थगिती दिली व व्यासपीठावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले. आता मनोज जरांगे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक ट्विट शेअर करत मनोज जारेंगेचं अभिंनदन केलं सोबतच एक सल्ला दिला. या ट्विटमध्ये ‘मागण्या मान्य केल्यानंतर आता आरक्षण कधी मिळणार हे मुख्यमंत्र्यांना विचारा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
अगदी सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा अंतरवालीसराटी मध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं. तेव्हा आंदोलनावेळी लाठीचार्ज झाल्यानंतर राज्यातील दिग्गज नेत्यांनी अंतरवली सराटी गावात जावून मनोज जरांगेंची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, आमदार बच्चू कडू, मंत्री संदीपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांनी देखील मनोज जरांगे यांची अंतरवली सराटी गावात जावून भेट घेतली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील अंतरवली सराटी गावात जावून मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.
“मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या”, असं राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. “आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना,भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल. लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा”, असा टोला देखील राज ठाकरे यांनी या ट्विटच्या माध्यमातून लगावला आहे.