7 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश नेत अजित पवारांसोबत गेले. त्यावेळी शरद पवारांसोबत राहिलेले काही मोजके नेतेही अजित पवारांना साथ देणार अशा चर्चा होत असतात. या चर्चांमध्ये एक नाव सातत्यानं घेतलं जातं ते नाव म्हणजे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे. हेच अमोल कोल्हे आता अजित पवारांसोबत येणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय.
“शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. असं असलं तरीसुद्धा ते कधीपण अजित पवार गटात येऊ शकतात.” पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, जिथे विद्यमान चार खासदार आमच्या पक्षाचे आहेत, त्या चार जागा आम्ही लढणारच आहोत. यासह भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या विदर्भातील जागांसह 9 जागांवर अजित पवार गटाचा दावा असल्याचं धर्माबाब अत्राम यांनी सांगितलं आहे. त्यामुळं आता धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेल्या दाव्यामुळं पुन्हा एकदा अमोल कोल्हेंच्या पक्षबदलाच्या चर्चा सुरू झाल्यात. यामुळेच आत्राम यांच्या दाव्यावर अमोल कोल्हे काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.