नांदेड | राज्यात अनेक घडामोडी घडत असताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षातून राजीनामा देऊन भाजपवासी झाले आहेत. आणि आता भाजपकडून त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देखील देण्यात आलीय. त्यानंतर आता भोकर विधानसभेतून अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया चव्हाण या देखील निवडणुकांच्या मैदानात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशोक चव्हाण हे भाजपमध्ये दाखल होताना, त्यांनी काही अटी ठेवल्याची माहिती आहे. त्यापैकी एक अट म्हणजे त्यांच्या कन्येला विधानसभेचं तिकीट देणं ही होती असंही बोललं जात आहे.
गेल्या काही दिवसापासून श्रीजया चव्हाण या राजकारणात सक्रीय दिसत आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये होती तेव्हा श्रीजया चव्हाण त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
त्यानंतर नांदेडमध्ये त्यांचे भावी आमदार अशा आशयाचे पोस्टर्स झळकले होते. त्यामुळे अशोक चव्हाण यांचा राजकीय वारसा आणि चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात येणार हे निश्चित झालं आहे.
भोकर विधानसभा मतदारसंघ
स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून भोकर मतदारसंघाची ओळख आहे. 2009 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी एक लाख वीस हजारांपेक्षा जास्त मते घेत विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 साली अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण इथून निवडणूकीत उभ्या होत्या. मात्र यावेळेला त्यांचं मताधिक्य वीस हजाराने घटलं होतं. या दरम्यान अशोक चव्हाण नांदेडचे खासदार होते. त्यानंतर 2019 मध्ये अशोक चव्हाण पुन्हा लोकसभेतून विधानसभेच्या मैदानात उतरले. त्यांनी 2019ची विधानसभा निवडणूक भोकर विधानसभा मतदारसंघातून लढवली आणि ते जिंकून आले. अशोक चव्हाण यांना त्यावेळी 1 लाख 40 हजार मतं मिळाली. त्यांच्याविरोधातील भाजप उमेदवार श्रीनिवास गोरठेकर यांना अवघी 43,114 मतं मिळाली होती…त्यामुळे नांदेडमधील विधानसभेत लेकीला उतरवून, विधानसभेत पाठवण्याचा निर्धार चव्हाण कुटुंबीयांचा दिसत आहे.