पुणे | येणाऱ्या लोकसभेसाठी सर्व पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली तरी काही ठिकाणी उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. त्यानुसार प्रचार देखील सुरु झाला आहे. केवळ राज्याचच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेला बारामती लोकसभा मतदार संघ हा पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात उभी फुट पडल्यानंतर आता या मतदार संघातून अजित पवार गटातून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.
राष्ट्रवादीतील शरद पवार गटातील उमेदवार सुप्रिया सुळे पुन्हा लढणार आहे. तसेच महायुतीकडून अजित पवार गटास ही जागा मिळणार आहे. महायुतीकडून अजित पवार गटाकडून कोण असणार? हे निश्चित झाल्याचे संकेत आता मिळत आहे. बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे अशी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पवार कुटुंबिय आमने सामने येणार आहे.
या मतदार संघात सुनेत्रा अजित पवार यांच्या उमेदवारीची फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांच्या माहिती व कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ फिरू लागला आहे. त्यासाठी गाडीवर फ्लेक्स लावले आहे. त्यात सुनेत्रा पवार यांचा मोठा फोटो घेतला आहे. तसेच अजित पवार यांचाही फोटो आहे. त्याचबरोबर सुनेत्रा पवार या सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघातील दौरा वाढला आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना पराभूत करणार असे आव्हान दिल्यानंतर सुनेत्रा पवारही शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या फिरताना दिसत आहे. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना शिरूर लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याचीही चर्चा आहे.