मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी सध्या महायुतीमध्ये खलबतं सुरु आहेत. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक जागा येणार आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळी तडजोड करावी लागणार आहे… त्यातच शिवसेनेच्या अनेक जागांवर भाजपाचा डोळा असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. त्यामुळं महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये लोकसभेच्या जागांचं वाटप अंतिमतः कसं असेल यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ पाहा…
भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. महाविकास आघाडीत जवळपास ४० जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. फक्त ८ जागांवरुन तिढा कायम आहे. तर दुसरीकडे आता महायुतीमधील घटकपक्षांची जागावाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महायुतीमध्ये लोकसभेला 32-12-4 या सूत्रानुसार जागावाटप होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपच्या वाटयाला सर्वाधिक म्हणजेच ३२ जागा, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वाट्याला १२ तर, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. त्यामुळं शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. अंतिम निर्णय हा दिल्लीतूनच होईल असं सांगितलं जात आहे.एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेनेचे एकूण १३ खासदार शिंदेंसोबत आले होते. सध्याच्या फॉर्म्युल्यानुसार लोकसभेला शिंदे गटाच्या वाट्याला फक्त १२ जागाच आल्यावर एका खासदाराचा पत्ता कट होऊ शकतो. हा खासदार कोण असणार हे आताच सांगता येणार नाही.
शिंदे गटाने यापूर्वी लोकसभेच्या १८ जागांची मागणी केली होती. परंतु, भाजपाची ताकद जास्त असल्यानं आणि ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे व अजित पवार यांचं बंड घडवून आणलं आहे… आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीतील नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप पाहता एकनाथ शिंदे व अजित पवार यांना मिळेत त्या जागांवर समाधान मानावं लागेल असं दिसतं.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार निवडून आलेल्या काही जागांवर भारतीय जनता पार्टी डोळा ठेवून असल्याची चर्चा आहे. येणाऱ्या काही दिवसात महायुतीतल्या जागावाटपाचं गणित सुटेल आणि कोणाला किती जागा मिळतात हे स्पष्ट होईल.