पुणे : शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता नवनीत राणा यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीवर भाष्य करत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
“उद्धव ठाकरेंनी कुणाशीही युती केली तरी ते यशस्वी होणार नाहीत. त्यांच्यामध्ये दम नाही. तसं असतं तर ते घरी बसले नसते”, अशी खोचक टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. राणांच्या या टीकेला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
“आमच्या गावाकडे एक म्हण आहे, ‘ह्याचं दार त्याचं दार बाई माझ्या तोंडात मार’ आपला मतदारसंघ सोडून दारोदार हनुमान चालिसा म्हणत फिरण्यापेक्षा एकाच ठिकाणी राहून संपूर्ण राज्याला करोना सारख्या महामारीतून वाचवणे हे जास्त पुण्याचं काम आहे आणि ते उद्धव साहेबांनी चोखपणे पार पाडलंय”. असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला आहे.
“उद्धवजी त्यांच्या घरात महाराष्ट्रात होते. त्यांचं टुरिंग टॉकीज नाही – सुरत, गुवाहाटी, गोवा आणि दिल्लीत जाऊन चौकिदारी करायला. उलट महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे राज्यपाल, देशाचे पंतप्रधान, केंद्रीय गृह मंत्री, गुजरात – आसाम – गोवा अशा तीन तीन राज्यांची गृह मंत्रालय, एका राष्ट्रीय पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष, 105 आमदार, 40 बंडखोर, ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग आणि हजारो लावारिस पेड ट्रोलर्स यांना कामाला लावायला फार दम लागतो नवनीत मॅडम” असं जोरदार प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांना दिले आहे.