मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत २ मार्च रोजी बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी विविध विकासकामांची उद्घाटन देखील होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत राज्यसभेचे खासदार असलेल्या शरद पवार यांचं नाव वगळण्यात आलं…. पत्रिकेवर खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण आणि खासदार श्रीरंग बारणे यांची नावं आहेत..मात्र शरद पवार यांचं नाव नाही.. त्यांना याचं आमंत्रण देखील देण्यात आलेलं नाही. त्यावर शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या घरी म्हणजेच गोविंदबागेत जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. दरम्यान , आता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आमंत्रणाला नकार दिला आहे. पण अद्याप अजित पवारांची भूमिका काही स्पष्ट झालेली नाही. त्या संबंधित देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एक पत्रही शरद पवारांना लिहंलं असून त्यांचे आभारही मानले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी पत्रात लिहिलं आहे..की, आपले २८ फेब्रुवारी २०२४ रोजीचे पत्र मिळाले. आपण आपल्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी निमंत्रित केल्याबद्दल मी आपला आभारी आहे. परंतु पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी आपल्याकडे इच्छा असुनही यावेळी येऊ शकणार नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.तरी भविष्यात नक्कीच आपल्याकडे भोजनाचा योग येईल असे मला वाटते. पुन्हा एकदा निमंत्रणाबद्दल धन्यवाद !! तर व्यस्त कार्यक्रमांमुळे आपण या जेवणासाठी हजर राहू शकणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी नम्रपणे सांगितलं आहे. आपले पत्र मिळाले. भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे.आपण जाणताच की, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि तदनंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे. त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निमंत्रण नाकारल्यानंतर आता अजित पवार निमंत्रण स्वीकारणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.