गांधी असो की मोदी, काँग्रेस असो की भाजपा हा आजवरचा इतिहास आहे की लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी यांना विदर्भाची भूमीच दिसते. काँग्रेसच्या इंदिरा गांधीपासून ते राहुल गांधीपर्यंत आणि आता भाजपाच्या नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनीच महाराष्ट्रातील विदर्भाची निवड त्यांच्या प्रचार मोहिमांच्या शुभारंभासाठी केली आहे. याचविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पाहा
विदर्भ हा महाराष्ट्राचा असा एक भाग आहे की दुर्दैवानं त्याची ओळख शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ आणि विकासाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात राहिलेला प्रदेश आहे म्हणून आहे. खरं तर, पायाभूत सुविधा निर्माण झाल्या असत्या तर, या विदर्भाच्या भूमीतून सोनं पिकवलं असतं असं बोललं जातं परंतु, विकासाचा अनुशेष इतका साचून राहिला की तो भरून काढायला कोणत्याच सरकारला वेळ भेटेना. काँग्रेसच्या काळात त्यांच्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी विदर्भालाच पसंती दिली आणि आता भाजपाचे सरकार आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यासाठी विदर्भाचीच निवड केली.
विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे परंतु, पक्षांतर्गतील कुरघोडींमुळं काँग्रेसला उतरती कळा लागली आणि त्याचा फायदा भाजप आणि शिवसेनेनं घेतला. त्यांनतर गेल्या दहा वर्षांत भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढली. नागपूर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. आणि तिथून भाजपसाठी काम करणारे अनेक बडे नेते तयार झालेत.
विदर्भामध्ये एकूण 10 लोकसभा मतदार संघ आहेत. त्यामध्ये पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली तर पश्चिम विदर्भातील बुलढाणा, वाशीम, अमरावती आणि अकोला असे 10 लोकसभा मतदार संघाचा समावेश होतो. यापैकी भारतीय जनता पक्षाचे सुनील मेंढे हे भंडारा-गोंदियाचे खासदार आहेत, रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने, वर्धामध्ये भाजपाचे रामदास तडस, चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे सुरेश धानोरकर खासदार होते त्यांचं नुकतंच निधन झालं. नागपूरमध्ये भाजपाचे नितीन गडकरी, गडचिरोलीत भारतीय जनता पक्षाचे अशोक नेते, बुलढाण्यात शिवसेनेचे प्रतापराव जाधव, यवतमाळ वाशीममध्ये शिवसेनेच्या भावना गवळी, अमरावतीमधून अपक्ष उमेदवार नवनीत कौर तर अकोल्यात भाजपाचे संजय धोत्रे खासदार आहेत हे सध्याचं चित्र आहे.
मुद्दा हा आहे की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी सर्वच राजकीय पक्षांना विदर्भ आपलासा वाटतो परंतु, सत्तेत आल्यानंतर विदर्भात विकासाची कामे करण्यास तो का वाटत नाही असा प्रश्न सहज पडतो. पूर्वी काँग्रेसला विदर्भानं साथ दिली गेल्या दोन्ही निवडणुकीत भाजपाला साथ दिली. विदर्भाला आपलं समजता, हक्कानं इथं प्रचाराचा शुभारंभ करता मग विकासाचा अनुशेष देखील तसाच हक्कानं भरून काढण्यास काय हरकत आहे असा प्रश्नही उपस्थित होतो.