वंचित बहुजन आघाडीने ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी वंचितनं ८ जणांची पहिली यादी जाहीर केली होती. म्हणजे, लोकसभेच्या महाराष्ट्रातील एकूण ४८ पैकी १९ जागांवर वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार घोषित केले आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर वंचितनं स्वबळाचा नारा देत आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.. पण त्याआधी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार आंबेडकर नागपूर आणि कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत. तशी घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातून देखील हालचालींना वेग आला आहे…वंचितच्या ताकदीचा धसका घेऊनच यावेळी काँग्रेस वंचितशी मिळवून घेत असल्याचं चित्र आहे.. वंचितमुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फटका बसला होता… नेमकं काय कारण आहे की, काँग्रेस आणि महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीचा धसका आहे. आणि आता वंचितनं कुठं उमेदवार उभे केलेत हेच या व्हिडिओतून जाणून घेउयात…
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीला राज्यात अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नव्हतं… त्याचं प्रमुख कारण होतं वंचित बहुजन आघाडी. वंचितच्या उमेदवारांमुळं ७ लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार पडले होते. तर, वंचितच्या १५ जागांवरील उमेदवारांना ९० हजार ते तीन लाखांपर्यंत मतं मिळाली होती… आणि विशेष म्हणजे तब्बल ३९ लोकसभा मतदार संघात वंचितचे उमेदवारांनी तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती.
वंचित बहुजन आघाडीने आता पर्यंत तब्बल १९ जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आता वंचित पुढच्या टप्प्यात आणखी किती जागांवर उमेदवार देणार हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. आणि या लोकसभा निवडणुकीत वंचितचा फटका कोणाला बसणार हे निकालातूनच स्पष्ट होईल…