लोकसभा निवडणुकीत आता उमेदवारांसह नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.नेता किंवा उमेदवार हे विकासाच्या मुद्यावर अधिक लक्ष न देता केवळ जातीच्या आणि राजकीय मुद्यावरच चर्चा केली जात असल्याचं दिसून येतंय.त्यामुळे मतदानाचे दोन टप्पे पार पडत असताना प्रचारातील विकासाचा मुद्दा मात्र पिछाडीवर जाताना दिसून येत आहे.पण असं का होत असेल? इतर मुद्देच का हायलाईट केले जात आहेत.? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ..
लोकसभा निवडणुकीचा प्रचार-पारा चढू लागला असून १९ एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान झालं…पण त्याची टक्केवारी घसरली. आणि त्यानंतर ‘चारसो पार’चा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या सत्तारूढ भाजपसहित त्या पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या प्रचार भाषणांचा सूर आणि नूरच बदलल्याचं दिसून आलं.गॅरंटी, विकास के पथ, विकसित भारत आदी शब्दांपेक्षा जातीय ध्रुवीकरणाचे नरेटिव्ह येऊ लागले.निवडणुका लढणाऱ्यांचं रोजीरोटीच्या, बेरोजगारीच्या, जिव्हाळ्याच्या प्रश्नांशी काही नातंच उरलं नसल्यासारखं धार्मिक मुद्द्यांवरच अधिक बोललं जातंय.
स्वातंत्र्याची पंचाहत्तरी उलटली तरी सत्तेवर येण्यासाठी भावना भडकावणाऱ्या मुद्द्यांचाच आधार का वाटायला लागतो हा प्रश्न उपस्थित होतो.आणखी २३ वर्षांनी आपला देश विकसित होणारच, याची खात्री भाजपने दिली आहे. या निमित्ताने काही विकसित देशांच्या निवडणुकांतील मुद्दे पाहिले तर शून्य टक्के चलनवाढ, ज्येष्ठांना आरोग्य सुविधा, नद्यांची स्वच्छता, पायाभूत सुविधांत वाढ असे मुद्देच ठळक असल्याचं दिसतं.पण आपल्याकडे प्रत्येक निवडणुकीत हिंदुत्व हा प्रचाराचा एक प्रमुख मुद्दा राहिला आहे. मोदी सरकारने काश्मीरमधील कलम ३७० हटवले, रामजन्मभूमी विषय मार्गी लावला, तीन तलाक बंदीसारखा स्वागतार्ह कायदा केला. उज्ज्वला, जनधन, गरिबांना अन्न यासारख्या अनेक कल्याणकारी योजना राबवल्या.जीएसटी, डिजिटल व्यवहारांसारखे असेही मुद्दे आहेत.पण सध्या प्रचारात विकासावर अधिक बोलणं असल्याचं दिसून येत नाही..
सलग दोन निवडणुका स्पष्ट जिंकल्यावर आणि तिसऱ्यांदाही भाजप नेतृत्वाला ‘चारसो पार’ जागा हव्या आहेत.त्यासाठी भाजप नेतृत्वाने महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे.मिशन ४५ साध्य करण्यासाठी आणि महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः राज्यात सभांवर सभा घेत आहेत. तर महाविकास आघाडीकडून देखील राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याही सभा पार पडत आहेत.अनेक वर्षापासून विकासापासून वंचित असलेल्या मराठवाड्याच्या विकासाचा मुद्दा सातत्याने चर्चेत राहतो. मात्र विकास होत नाही.