काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले संजय निरुपम आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत. संजय निरुपम 3 मे रोजी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संजय निरुपम यांनी 1 मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर संजय निरुपम यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केला आहे. संजय निरुपम 20 वर्षांनंतर शिवसेनेत घरवापसी करणार आहेत.
संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, पुढे काय करायचं यावर विस्तृत चर्चा झाली. 3 मे रोजी दुपारी 3 ते 4 वाजता शिवसेना पक्षात प्रवेश करणार, पुढील माहिती तुम्हाला पक्षाकडून भेटेल, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट आणि चर्चा झाल्यानंतर संजय निरुपम यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ही माहिती दिली.
आज मी बाळासाहेब भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलावण्यावर त्यांची भेट घेतली. त्यांची भेट घेतल्यावर पुढे काय आणि कसं काम करायचं यावर सविस्तर चर्चा झाली. 3 मे रोजी दुपारी मी शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिवसेना पक्षात प्रवेश केल्यावर पक्षाच्या सर्व उमेदवारांचा जोरदार प्रचार करणार. शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी व्हावेत यासाठी प्रयत्न करणार, असही यावेळी संजय निरुपम यांनी सांगितलं आहे.
शिवसेना प्रवेशाबाबत बोलताना संजय निरुपम म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे मुंबईत किंवा राज्यात जे मतदार आहेत, त्यांचा जोरदार प्रचार करणार. पक्षाचा आदेश असेल, तिथे जाऊन उमेदवारांचा प्रचार करणार. शिवसेनेत प्रवेश होतोय, ही खूप आनंदाची बाब आहे. 20 वर्षांनंतर ही माझी घरवापसी आहे, 20 वर्षांपूर्वी ते माझं घर होतं. आता 20 वर्षांनंतर पुन्हा मी माझ्या घरात प्रवेश करणार आहे, असंही निरुपम यांनी म्हटलं. त्यामुळं आता 20 वर्ष शिवसेनेपासून दूर राहिलेले संजय निरुपम अखेर त्यांच्या स्वगृही परतणार या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे.