लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून राज्यात तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा उद्या शेवट होत आहे. त्यानंतर, 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवर मतदान होत आहे. दुसरीकडे महायुती व महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांची यादी जाहीर झाली असून कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र पुन्हा एकदा लोकसभेच्या रणांगणात उतरले आहेत. त्यामुळे, कल्याण लोकसभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचे आव्हान असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, श्रीकांत शिंदे यांनीही शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वत: मतदारसंघात गाठीभेटी वाढवून विशेष लक्ष्य देऊन स्थानिक नेत्यांची मर्जी राखण्याचं काम सुरू केलं आहे. पुत्र श्रीकांत यांचा विजय सोपा करण्यासाठी मुख्यमंत्री धावपळ करताना दिसून येतात. त्यातच, शिवसेना उबाठा गटाचे कल्याण ग्रामीणमधील उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासह केशव पाटील, शाखाप्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या पक्षप्रवेशामुळे श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीला ताकद मिळाल्याचं दिसून येते.
विशेष म्हणजे जवळपास महिनाभरापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदेंच निवडणुक लढतील असं स्पष्ट केलं होतं. मात्र, नूकतीच शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. आणि त्यानंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात लक्ष घातल्याचं पहायला मिळतंय. सध्याच्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंना आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ठाणे आणि कल्याणच्या जागेवर विजय मिळवणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं बोललं जातंय. याच कारणातून कल्याणमधून मुलगा श्रीकांंत शिंदे आणि ठाण्यातून त्यांचे अत्यंत विश्वासू असणारे नरेश म्हस्के यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय. आणि दोघांच्याही प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी जोरदार फिल्डिंग लावल्याचंही दिसतंय.