देशभरात सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. अशा परिस्थितीत अगदी 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यांतील मतदान पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्या देशाचं लक्ष वेधलं गेलं होतं. कारण ठरलेली ती बारामतीतील पवार विरुद्ध पवार अशी लढाई. बारामतीत महाविकासआघाडीकडून सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात असल्या तरीही राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ही लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी प्रतिष्ठेची झाल्याचं पहायला मिळालं. बारामतीतील मतदान पार पडेपर्यंत दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोलही करण्यात आला. मात्र, आता 7 मे रोजी बारामतीतील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात.
लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात. याला कारण ठरतायेत त्या गेल्या दोन दिवसांमध्ये घडलेल्या काही राजकीय घटना. याची सुरुवात होते ती अर्थातच बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या दिवशी. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यांत 7 मे रोजी मतदान पार पडलं. यावेळी अजित पवारांसह त्यांच्या कुटुंबियांनीही मतदानाचा हक्क बजावला. मात्र, मतदान प्रक्रिया सुरू असतानाच सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं ते सुप्रिया सुळे यांनी. आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुप्रिया सुळे या थेट काटेवाडीतील अजित पवारांच्या घरी एकट्याच दाखल झाल्या. “आपलं बालपण अजितदादांच्या घरी गेलंय. त्यामुळं मी माझ्या काकीचा अर्थात अजित पवारांच्या मातोश्रींचा आशिर्वाद घेण्यासाठी याठिकाणी आले” असं यावेळी सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. मात्र, मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी आशिर्वाद घेण्याऐवजी सुप्रिया सुळे मतदान केल्यानंतर अजित पवारांच्या घरी दाखल झाल्यानं या चर्चा अधिक बळावल्या. यानंतर दोन्ही पवार एकत्र येतील अशा चर्चांना अधिक बळ देण्यासाठी स्वतः शरद पवार आणि अजित पवार यांची विधानं कारणीभूत ठरतात.
बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर शरद पवारांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत अनेक प्रादेशिक पक्ष पुढील काळात काँग्रेसमध्ये विलीन होतील असं सूचक विधान शरद पवारांनी केलं. मात्र, त्यापेक्षाही महत्त्वाचं एक विधान शरद पवारांनी या मुलाखतीत केलं. अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का? अशा आशयाच्या एका प्रश्नावर उत्तर देताना शरद पवारांनी “अजित पवारांना पुन्हा आमच्यासोबत यायचं असेल तरी आम्ही त्यांना घेणार नाही.” असं म्हणत अजित पवारांसाठी परतीचे मार्ग बंद झाले असल्याचा इशारा यावेळी शरद पवारांनी दिला. मात्र, शरद पवार जी विधानं करतात अनेकदा त्याविरुद्ध कृती घडत असल्याचं आपल्याला बघायला मिळालंय. याच गोष्टीचा दाखला देत अजित पवारांनीही शरद पवारांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली. “निलेश लंके यांनी आमच्यासोबत पक्ष सोडला होता. त्यांचं पुन्हा पक्षात स्वागत केलं ना? हे फक्त सांगायचं असतं. यामध्ये काहीही तथ्य नाही. राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशी विधानं काही वेळा केली जातात” असं म्हणत अजित पवारांनीही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याबाबत संकेत दिले.
विशेष म्हणजे निवडणूक प्रचारावेळी भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील बारामतीत गेले असताना त्यांनी आम्हाला शरद पवारांना बारामतीत हरवायचंय असं विधान केलं होतं. या विधानावरूनही अजित पवारांनी आता जाहीर नाराजी व्यक्त केलीये. बारामतीतील लढाई ही सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी आहे. यात शरद पवारांना पराभूत करण्याचा प्रश्न येत नाही असं म्हणत अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे अलिकडे झालेल्या एका सभेत बोलताना अजित पवारांनी “पवार साहेब माझे नेते आहेत यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. त्यांच्या आजूबाजूचे काही लोक शरद पवारांना प्रचारासाठी घेऊन फिरतायेत” असं म्हणत काकांप्रती असणारी काळजी बोलून दाखवली होती. त्यामुळं बारामतीतील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांचे बदललेले सूर पवार कुटुंबिय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार या चर्चांना बळ देणारे ठरतायेत.