पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (14 मे) वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जोरदार शक्तिप्रदर्श केलं. यावेळी देशभरातील महायुतीचे अनेक दिग्गज नेते देखील उपस्थित होते. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. नरेंद्र मोदींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या सर्वच नेत्यांकडून मोदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांनी नरेंद्र मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप भेट देत सत्कार केला. यावरून सर्वच बाजूंनी प्रफुल्ल पटेलांवर टीकेची झोड उठली.
प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदी यांचा सत्कार करत असताना मोदींच्या मस्तकावर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप चढवला. त्यानंतर सर्वच स्थरावरून प्रफुल्ल पटेलांवर टीका होऊ लागल्या. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही प्रफुल्ल पटेलांवहर जोरदार टीका करण्यात आली. तर संभाजी ब्रिगेडनंही या घटनेवर आक्षेप नोंदवत मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणं अयोग्य असल्याचा इशारा दिला.
या सगळ्या टीकांच्या पार्शवभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ.” असं म्हणत घडलेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता हा वाद शांत होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.