मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. धरणसाठा मोठया प्रमाणात खालावला आहे.धरणांमधील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे देखील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. यामुळे अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणाची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातच सर्वाधिक टँकरची आवश्यकता भासू लागली आहे.
राज्यात अनेक भागांत वळीव पाऊस पडतो आहे. मात्र या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान होत आहे. पाण्याचे दुर्भिक्ष काही कमी होताना दिसत नाही.
सध्या राज्यातील लहान मोठ्या धरणांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.मराठवाड्यात पाणी संकट अधिकच गडद होत चालले आहे. मराठवाड्यातील ७ जिल्ह्यात तब्बल १ हजार ७०६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ग्रामीण भागात अनेक गावांतील विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत.शेततळे देखील कोरडी पड्ल्याची परिस्थिती उदभवली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांसमोर दिवसभर पाणी कसं पुरवायचं हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. पाण्यासाठी सर्वात जास्त कसरत ही महिलांनाच करावी लागत आहे.पाण्याच्या शोधात मैलोंमैल भटकावे लागत आहे.सध्या उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्हयात ६५६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.जालन्यात ४८८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. बीडमध्ये ३८२, नांदेडमध्ये ५ धाराशिवमध्ये १३१ आणि लातूरमध्ये २१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
मराठवाड्यातील्या धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.गेल्या आठवडाभरात वळीव पाऊस झाल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाला असला, तरी पिण्याच्या पाण्याने मात्र नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार सध्या राज्यातील मोठ्या धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा केवळ २३.४३ टक्के असून, मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी कमी झाला आहे. मध्यम धरणांत ३५ टक्के, तर लघू पाटबंधारे प्रकल्पांत २७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या चिंताजनक परिस्थितीवर राज्य सरकार काय उपाय करणार, दुष्काळग्रस्त भागांत पिण्याच्या पाण्याची सोया कशी केली जाणार हे पाहावे लागेल.