नाशिक | महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. गेल्या काही दिवसांत भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांची दोनवेळा बाजू घेतल्याचं दिसून आलं. मुंबईत होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली, तेव्हा भाजप नेत्यांनी त्यासाठी उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरलं होतं..त्यावेळी भुजबळ यांनी उघडपणे उद्धव ठाकरे यांची बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं.त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना काही वाटलं नाही का, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला होता. हा प्रश्न राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारावा असं भुजबळ यांनी म्हटलं..नाशिकच्या उमेदवारीवरूनही भुजबळ नाराज होते. आता पुन्हा एकदा समोर आलेली नाराजी नाशिकचं गणित बिघडवणारी ठरणार का ? हेच आपण या व्हिडिओतून पाहू….
लोकसभेच्या जागावाटपापासूनच महायुतीत धुसफूस सुरू असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. सर्वेक्षणे नकारात्मक असल्याचा हवाला देत भाजपने महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी केल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना सुरवातीला दबावात आल्यासारखी वाटली पण नंतर त्यांनी आपला वाटा मिळवला. शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी दबाव झुगारून लावला. राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र हे शक्य झालं नाही. नाशिकच्या जागेचा तिढा अनेक दिवस कायम राहिला.महाविकास आघाडीच्या उमेदवाराने आपल्या प्रचाराच्या फेऱ्या पूर्ण केल्या तरी महायुतीतून नाशिकचा उमेदवार कोण हे ठरलं नव्हतं.
नाशिकचे शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्याविषयी नकारात्मक वातावरण आहे, असं सांगत त्यांना उमेदवारी देण्यास भाजपने विरोध केला होता. त्यापूर्वी अशाच प्रकारातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी रद्द करावी लागली होती. नाशिकच्या बाबतीत मात्र शिंदे यांनी ठाम भूमिका घेतली.पण हा अंतिम निर्णय होण्याआधी नाशिकची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार आणि आणि छगन भुजबळ उमेदवार असणार, असं जवळपास निश्चित झाल्याची परिस्थिती दिसून येत होती. माझ्या उमेदवारीला दिल्लीतून हिरवा कंदिल मिळाला आहे, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आपल्या पाठिशी आहेत असा संदेश भुजबळ यांनी दिला होता. तरीही हा तिढा लवकर सुटला नाही, कारण खासदार हेमंत गो़डसे यांनी शेवट पर्यंत नमती भूमिका घेतली नाही.उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे अनेक वाऱ्या सुरु ठेवल्या.
इथं विद्यमान खासदार असताना हाही मतदारसंघ सोडला असता तर कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला असता, याची जाणीव मुख्यमंत्री शिंदे यांना होती. एकनाथ शिंदे आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीला माघार घ्यावी लागली आणि हेमंत गो़डसे उमेदवारी आपल्याच पदरात पडून घेण्यात यशवस्वी ठरले…या सर्व घडामोडी घडल्या असल्या तरी इथं एक बाब नाकारून चालणार नाही ती म्हणजे भुजबळ यांनी नाशिक लोकसभा लढवण्याची मानसिक तयारी केली होती. माझी उमेदवारी दिल्लीतून निश्चित झाली आहे, असे ते त्यामुळेच म्हणत होते. असं असतानाही जागा राष्ट्रवादीला सुटली नाही आणि उमेदवारी मिळाली नसल्याने भुजबळ नाराज झाले असावेत.