राज्यात लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत…पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी एक मोठ वक्तव्य केलं आहे.
झालेल्या चार टप्प्यातील निवडणुकीत पैसे वाटल्याच्या आणि मतदारांवर दबाव आणण्यात आल्याच्या अनेक बाबी समोर आल्या होत्या त्यात बीड आणि बारामतीतील मतदानाच्या वेळी पैशांचा गैरवापर आणि काही व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. आता शरद पवारांनी बीड आणि बारामतीत बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे. तसेच या संदर्भात निवडणूक आयोगाकडे कडक कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
बीड, पुणे, बारामती लोकसभा मतदारसंघ सोडले तर बाकी ठिकाणी मतदान शांततेत पार पडलं. महाराष्ट्रात कधीच पैशाचा वापर झाला नव्हता. यावर्षी मोठया प्रमाणात पैशांचा वापर झाला. बारामती लोकसभा मतदारसंघात रात्री दोन वाजता एक बँक उघडी होती आणि तिथून पैसे वाटपाचा प्रकार घडला आहे. बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान झालं आहे. बीडमध्ये बूथ कॅप्चर करण्याचा प्रकार झाला. बोगस मतदान करणे, लोकांना मतदान करू न देणे हे देखील प्रकार घडले. पुणे जिल्ह्यात देखील असे प्रकार पाहायला मिळेल. यामागे जो आहे त्याच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे असा आग्रह पवारांनी केला आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या सध्याच्या भूमिकेवर देखील शरद पवारांनी वक्तव्य केले आहे. शरद पवार म्हणाले, निवडणूक आयोगाने सध्याचे काही निर्णय घेतल्यामुळे अडचण होत आहे. आमचा पक्ष काढून घेतला, आमचे चिन्ह काढून घेतल्यामुळे आम्हाला कोर्टात जावं लागलं. मात्र आम्ही यंदाच्या निवडणुकीत सामंजस्याची भूमिका घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आम्ही स्वतः 48 पैकी दहा जागा लढवत आहोत. आमच्या या भूमिकेमुळे आम्हाला फायदा होताना पाहायला मिळत आहे.