यंदाची लोकसभा निवडणूक ही फार वेगळी आणि निर्णायक मानली जात आहे कारण अनेक विषय या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यातीलच एक मुद्दा सातत्याने कानावर पडत होता तो म्हणजे पंतप्रधानांचा. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून विद्यमान पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह १५ पंतप्रधान लाभले आहेत. एनडीएकडून पुन्हा भाजपचे नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचा चेहरा असतील असं वारंवार बोललं जात आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हेच पंतप्रधान असतील असं बोललं जात आहे. इंडिया आघाडित पंतप्रधानपदाचा चेहराच नाही असं सत्ताधारी भाजप आणि एनडीएकडून टीका केली जाते मात्र याठिकाणी एक प्रश्न साहजिकच पडतो तो म्हणजे उत्तर प्रदेशच पंतप्रधान का ठरवतो? उत्तर प्रदेशच का आहे दिल्लीकडे जाणारा राजमार्ग? यासंदर्भात जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ पाहा…
भारताच्या इतिहासातील १८ व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांची चर्चा केली जात आहे. चर्चेत असणारा महत्वाचा मुद्दा आहे पंतप्रधानपदाचा. २०११ च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येच्या १६.५१ % म्हणजे जवळपास १७ टक्के लोकसंख्या असलेलं उत्तर प्रदेश भारताच्या सहा पंतप्रधानांचं जन्मस्थान आहे. याशिवाय जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, चरण सिंह, राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, अटलबिहारी वाजपेयी या आठ पंतप्रधानांनी लोकसभेत उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व केलं आहे. उत्तर प्रदेश नंतर पंजाब हे दुसऱ्या क्रमांकावर आहे तर गुजरात हे तिसऱ्या क्रमांकावर आहे…भारताला गुजरातमधील आतापर्यंत मोरारजी देसाई आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी असे दोन पंतप्रधान मिळाले आहे. पदावर असलेल्या सर्व पंतप्रधानांपैकी सर्वात जास्त कार्यकाळासाठी ७५% ज्या पंतप्रधानांनी काम केले त्यांनी उत्तर प्रदेशातील खासदार म्हणूनही भूमिका वठवली आहे. यामध्ये नेहरूंचा सुमारे १६ वर्षांचा कार्यकाळ, त्यांची कन्या इंदिरा गांधी यांचा १५ वर्षांचा कार्यकाळ, अटलबिहारी वाजपेयी यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ पासून पंतप्रधानपदावर आहेत.
काँग्रेसने दिलेल्या सर्व पंतप्रधानांचा जन्म उत्तर प्रदेशात झालेला नसला तरी, त्यांनी शेवटी जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू यांच्या वडिलोपार्जित राज्याचेच प्रतिनिधित्व केलं आहे. याचं आणखी एक कारण सांगायचं झालं तर, नेहरू-गांधी कुटुंबाचा उत्तर प्रदेशशी विशेष संबंध आहे. नेहरू-गांधी वंशाने सातत्याने उत्तर प्रदेशशी संबंध ठेवले असले तरी राज्याने प्रत्येकवेळी त्यांच्यासाठी अनुकूलता दाखवली नाही. १९७५ साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींना निवडणूक गैरव्यवहारासाठी दोषी ठरवलं आणि त्यानंतर १९७७ साली त्यांचा पक्ष, काँग्रेस (आय) संपूर्ण राज्यात एकही जागा जिंकू शकला नाही. इंदिरा आणि राजीव गांधी दोघांनीही अनुक्रमे रायबरेली आणि अमेठीच्या जागा गमावल्या आणि मोराजी देसाई त्यावेळी पंतप्रधान झाले.
२०११ च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. उत्तर प्रदेशातून ८० खासदार लोकसभेवर निवडून जातात. त्यानंतर महाराष्ट्र ४८ सदस्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशातील खासदारांचा लोकसभेत २० टक्क्यांचा वाटा आहे आणि राज्यातील निर्णायक विजय अनेकदा केंद्रात कोणाची सत्ता येईल हे ठरवतो. स्वातंत्र्यानंतरच्या तीन दशकांत उत्तर प्रदेश हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता परंतु नंतर मोठा बदल झाला. त्यामुळे १९७७ मध्ये काँग्रेसचा पहिला पराभव झाला आणि १९९० च्या दशकात भाजपचा उदय झाला. २०१४ साली भाजपने उत्तर प्रदेशात विक्रमी ७१ जागा जिंकल्या. युतीच्या मित्रपक्षाने आणखी दोन जागा जिंकल्या त्यापूर्वी १९८४ साली काँग्रेसने यूपीमध्ये ८५ पैकी ८३ जागा जिंकल्या होत्या. दिल्लीकडे जाणारा राजमार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं अनेकदा म्हटलं जातं आणि तेच १९५२ पासून आजवर सातत्याने प्रत्येक निवडणुकीत दिसून येतं त्यामुळे बहुतेक पंतप्रधान होऊ इच्छिणाऱ्यांनी उत्तर प्रदेशाचीच निवड केलेली दिसून येतीय.