निसर्गाने समृद्ध अशा कोकणात पैशाच्या जोरावर अनेक परप्रांतीय जमिनी खरेदी करून त्यावर आपले इमले उभारत आहेत तर काही कोकणवासीय आपल्या वडिलोपार्जित जमिनी परप्रांतीयांच्या हवाली करून स्वतः भूमिहीन होत आहेत.. एकीकडे हा प्रकार सुरु असताना दुसरीकडे असाच किंवा याहूनही गंभीर प्रकार सातारा जिल्ह्यात घडल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत…गुजरातमधील अहमदाबादच्या जीएसटी कमिशनरने महाबळेश्वरच्या कांदाटी खोऱ्यात तब्बल ६२० एकर जमीन खरेदी केल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमका हा विषय काय आहे ? या व्हिडिओतून जाणून घेऊ..
सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम कांदाटी खोऱ्यातील जमीन एका सनदी अधिकाऱ्याने बळकावल्याचं माहिती अधिकारातून उघड झाल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला. हे सनदी अधिकारी मुळचे नंदूरबारचे असून सध्या गुजरातमध्ये जीएसटीचे मुख्य आयुक्त या पदावर कार्यरत असल्याचं वृत्त फ्री प्रेस जर्नल या दैनिक वृत्तपत्राने दिलं होतं..यात दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबारचे रहिवासी आणि सध्या गुजरातच्या अहमदाबादमध्ये जीएसटीचे मुख्य आयुक्त असलेले चंद्रकांत वळवी यांनी त्यांचे कुटुंब आणि नातेवाईकांसह महाबळेश्वरजवळील कांदाटी खोऱ्यातील झाडाणी गावाची संपूर्ण जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे याठिकाणची ६२० एकर जमीन बळकावल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे.सह्याद्री वाचवा मोहिमेअंतर्गत माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली होती..जिल्ह्यातील दुर्गम आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कांदाटी खोऱ्यातील झाडाणी हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रानजीक वसलं आहे. संबंधित सनदी अधिकाऱ्याने हे संपूर्ण गावच खरेदी केलं आहे. यामुळे, १९८६ चा पर्यावरण संरक्षण कायदा, १९७६ चा वन संवर्धन कायदा आणि १९७२ चा वन्यजीव संरक्षण कायदा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कायद्यांचं नियमित उल्लंघन केलं जात आहे, असा आरोप सुशांत मोरे यांनी केला आहे.. “या कायद्यांचे उल्लंघन केल्याने नैसर्गिक संसाधने आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या उल्लंघनांमुळे जैवविविधतेचे नुकसान, वायू आणि जल प्रदूषण आणि हवामान बदल यासह गंभीर परिणाम होत आहेत.सध्या या भागात अनधिकृत बांधकामे, खोदकाम, झाडे तोडणे, बेकायदेशीर रस्ते, जंगलाच्या हद्दीतून होणारा वीजपुरवठा यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे”, असं ही सुशांत मोरे म्हणाले.
झाडाणी हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राच्या जवळ वसलं आहे. याठिकाणी घनदाट जंगल असल्याने इथं वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास आहे.त्यामुळे या गावाचं या आधीच पुनर्वसन झालं आहे. सध्या या गावात लोकवस्ती नाही. पण तुमचं पुनर्वसन झालंय, त्यामुळे तुमची जमीन शासन जमा होणार असं सांगत, लोकांना भीती दाखवून केवळ आठ हजार रुपये एकरने ही जमीन संबंधितांनी खरेदी केल्याचा दावा सुशांत मोरे यांनी केला आहे…गेल्या ३ वर्षापासून याठिकाणी अवैध बांधकाम, मोठ्या प्रमाणात खाणकाम व उत्खनन सुरू आहे. मात्र प्रशासनातल्या कोणत्याही घटकाला याची पुसटशी देखील कल्पना नसावी याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यामुळे तहसीलदार, तलाठी याठिकाणी कधीही फिरकत नसल्याचं भीषण वास्तव समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे…इथल्या “एकूण भूखंडापैकी ३५ एकर क्षेत्रात जंगल रिसॉर्ट कोणतीही परवानगी न घेता उभे राहत आहे. त्यासाठी दोन पदरी रस्ता देखील होत आहे. याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ही सुशांत मोरे यांनी केली आहे.