पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा वाराणसीतून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. वारणसीत देशातील सातव्या टप्प्यांत अर्थात 1 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत आता नरेंद्र मोदींनी वाराणसीकरांसाठी एक पत्र लिहीलं आहे. या पत्रातून नरेंद्र मोदींनी काशीतील जनतेलाही खास आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदींनी लिहिलेले हे पत्र वाराणसीतील 2000 घरांपर्यंत पोहोचवण्याचं काम भाजप कार्यकर्ते करत आहेत. या पत्रातून मतदारांना 1 जून रोजी मतदान करण्याचे आणि मोदींना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे पत्रक गराघरात पोहोचवण्याचं काम करणाऱ्या भाजपा युवा मोर्चाचे प्रां. ज्ञान प्रकाश मिश्रा यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे विशेष पत्र वाराणसीकरांसाठी लिहिले आहे. वाराणसीतील 2000 घरांमध्ये हे पत्र पाठवण्यासाठी भाजप कार्यकर्ते काम करत आहेत. कार्यकर्ते स्वतः घराघरांमध्ये जाऊन हे पत्र पोहोचवित आहेत. या सोबतच कार्यकर्ते मतदानाच्या दिवशी मतदारांनी मोठ्या संख्येनं बाहेर पडावं आणि भाजपला मतदान करावं असं आवाहनही करत आहेत.
पंतप्रधानांच्या पत्रात काशीतील जनतेसाठी विशेष आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारार्थ वाटण्यात येत असलेल्या या पत्रात काशीतील जनतेसाठी विशेष आवाहन करण्यात आले आहे. “तुम्ही परिवारासह 1 जून रोजी मोठ्या संख्येनं मतदानाला हजर राहा. सोबतंच तुमचं बहुमुल्य मत भाजपच्या बाजूने असेल याची मला खात्री आहे. बाबा विश्वनाथ यांच्या आशिर्वादाने आजवर मी खूप कामं करू शकलो आहे. पुढील वाटचालीसाठी तुमच्या मुलाच्या रुपाने तुम्ही मला खासदार म्हणून निवडून द्याल अशी अपेक्षा आहे.” असं म्हणत पत्रातून काशीतील जनतेला भावनिक साद घालण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.