मुंबई I महाराष्ट्रातील खासदारकीच्या निवडणूकांपासून संभाजीराजे छत्रपती हे कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्यातील राजकारणात चर्चेत राहिले आहेत. मराठा समाजाचा चेहरा संभाजीराजे छत्रपती असून मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व त्यांनी बेधडकपणे सांभाळले. उपोषणे केली. आता मात्र संभाजीराजेंचं नेतृत्व आम्ही स्वीकारणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.यावर संभाजीराजेंनी भली मोठी पोस्ट शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेवर संभाजीराजे छत्रपती यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.
या पत्रात त्यांनी भूमिका मांडत सांगितले आहे की, मराठा आरक्षणाच्या लढ्यात मी काही आज आलेलो नाही. २००७ पासून मी या चळवळीत पूर्णतः सक्रिय आहे. माझा राजवाडा, घरदार सोडून, वैभवसंपन्न जीवनशैली सोडून मी महिनो महिने समाजासाठी राज्यभर फिरत असतो. संसदेच्या प्रांगणात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारा मी एकमेव व्यक्ती आहे. माझे प्रामाणिक कार्य पाहून कित्येक संघटनांनी, लोकांनी अनेकवेळा माझ्याकडे नेतृत्व दिले, पण कधीही मी स्वतःहून हे नेतृत्व स्वीकारले नाही. नेता म्हणून मिरवलो नाही. २०१७ साली मुंबई येथे मोर्चाचा स्टेजवर जाऊन समाजाला दिशा दिली, यामुळे आपले मोठे राजकीय नुकसान होणार याची कल्पना असूनही स्वतःपेक्षा समाजाचा विचार केला. फेसबुकवर लिहिणारे आणि मीडियावर बोलणारे राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलेले काल आलेले मूठभर लोक म्हणजे समाज नव्हे, अशा शब्दात संभाजीराजेंनी मराठा मोर्चाच्या समन्वयांना रोखठोक आणि कठोर प्रत्युत्तर दिलं आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लागेल, अशी मराठा समाजाला आशा आहे. पावसाळी अधिवेशनात काहीसा आशेचा किरण त्यांना दिसून आला. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मराठा आरक्षणातून निवड होऊनही गेली काही वर्षे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या १,०६४ मराठा तरुणांना सरकारी सेवेत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा केला गेला. मात्र त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले होते. अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणासाठीची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत काहीच उल्लेख करण्यात आला नाही. बैठकीला उपस्थित असणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समन्वयकांना तसे बजावले होते. त्यामुळे सरकारने संभाजीराजे छत्रपती यांनाही मॅनेज केल्याचे दिसत आहे, असा घनाघाती आरोप मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला. त्यांच्या याच आरोपांना संभाजीराजेंनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून रोखठोक उत्तर दिलं आहे.