एकाच कुटुंबातील तीन पिढ्या तुरुंगात
पुणे | पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास बड्या बिल्डरच्या अल्पवयीन पुत्राने आपल्या आलिशान पोर्शे कारने बाईकवरील दोघांना चिरडलं. या भीषण अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोन आयटी इंजिनिअर्सचा जागीच जीव गेला. या घटनेनंतर जमावाने आरोपीला पोलिसांच्या हवाली केलं. त्याला पोलिस ठाण्यात पिझ्झा आणि बर्गर खाऊ घातल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला. या प्रकरणाची वरिष्ठांना माहिती न दिल्याने दोन पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली असून त्यांचे निलंबन करण्यात आले. या प्रकरणामुळे पुणे पोलिसांवर चौफेर टीका केली जात आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचाही आरोप सातत्याने केला जातोय.
बिल्डर विशाल अगरवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत अगरवाल याने पबमध्ये जाऊन पार्टी केली. यावेळी त्याच्यासोबत त्याचे काही मित्रही होते. हेच नाही तर दोन पबमध्ये जाऊन त्यांनी दारू पिली. या पार्टीचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दारूच्या नशेत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना उडवलं. या अपघात प्रकरणात मुलाला वाचवण्यासाठी बिल्डर विशाल अगरवाल यांनी चालकाला थेट सांगितले की, गाडी तूच चालवत होता हे सांग. मी तुला मोठे बक्षिस देईल.त्यामुळे विशाल अगरवाल याच्यावर पुरावा नष्ट करण्याचे कलम २०१ लावण्यात आले आहे. तसेच शासनाची फसवणूक केल्याने कलम ४२० देखील लावण्यात आले आहे. विशाल अगरवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. वडिलांनीच आपल्याला गाडी चालवण्याची परवानगी दिल्याचे अल्पवयीन मुलाने खुलासा केला आहे. आता या अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आजोबांना देखील पोलिसांकडून अटक करण्यात आलीये.मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना २८ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्यात आलंय. सुरेंद्र अगरवाल यांच्यावर देखील अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुरेंद्र अगरवाल यांच्यावर कलम ३६५ आणि कलम ३६८ लावण्यात आले आहेत. सुरेंद्र अगरवाल यांनी दोन दिवस ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. इतकंच नाही तर त्यांच्याकडून ड्रायव्हरला जबाब बदलण्यासाठी दबाब आणला जात होता.यापूर्वी पोलिसांनी सुरेंद्र अगरवाल यांची चाैकशी केली होती. सुरेंद्र अगरवाल यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांना पोलिसांनी बोलावलं होते. आता नातू, मुलगा आणि आजोबा हे तिन्ही जण तुरुंगात आहेत. पोलिसांनी सुरेंद्र अगरवाल यांच्या घरावरही छापेमारी केलीये. सीसीटीव्ही फुटेजसोबत छेडछाड करण्यात आल्याचीही माहिती तपासातून उघड झाली आहे.