पुणे | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्यात दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला असून कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला आहे तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ९४.७३ टक्के लागला आहे. अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
यंदाच्या निकालात मुलींनी आपली परंपरा सुरु ठेवत बाजी मारली आहे. नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.२१ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५६ आहे. मुलींची टक्केवारी मुलांच्या टक्केवारीपेक्षा २.६५ने जास्त आहे.
दरम्यान, मार्च २०२३ चा निकाल ९३.८३ टक्के होता जो आता मार्च २०२४ चा निकाल ९५.८१ टक्के आहे. मार्च २०२३ तुलनेत यंदाचा निकाल १.९८ टक्क्याने जास्त आहे. यंदाच्या निकालात राज्यातील एकूण १८७ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांसह १०० टक्के गुण मिळाले आहेत. यामध्ये पुण्यातील १०, नागपूरमधील १, छत्रपती संभाजीनगरमधील ३२, मुंबईतील ८, कोल्हापूरमधील ३, अमरावतीमधील ७, लातूरमधील १२३, कोकणमधील ३ आणि नाशिकमधील ० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
कोकण ९९.०१
कोल्हापूर ९७.४५
पुणे ९६.४४
मुंबई ९५.८३
अमरावती ९५.५८
नाशिक ९५.२८
लातूर ९५.२७
छत्रपती संभाजीनगर ९५.१९
नागपूर ९४. ७३