जे पी नड्डा यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे भाजप म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या शोधात आहेत. पक्षाध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या नावांपैकी बहुतांश नेते केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्यामुळे आता पक्षाचे महासचिव विनोद तावडे यांचं नाव चर्चेत आलं आहे.. त्यामुळे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. ही शक्यता का आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.भाजपाने ‘एक व्यक्ती, एक पद’ या धोरणाचा अवलंब केल्याने आता पक्षाकडून नवीन अध्यक्षांचा शोध सुरु आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून पक्षाचे दिग्गज नेते नड्डा यांनी भाजपा अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. २०२० पासून ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. या वर्षी जानेवारीत त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती, आता त्यांचा कार्यकाळ जूनमध्ये पूर्ण होणार आहे.त्यामुळे आता हा पदभार नक्की कोण सांभाळणार, कुणाला संधी दिली जाणार म्हणून चर्चेत असलेल्या नावांमध्ये विनोद तावडे यांचं नाव आघाडीवर आहे. मूळचे महाराष्ट्राचे असलेल्या विनोद तावडे यांनी राष्ट्रीय राजकारणात आपला चांगला जम बसवला आहे. विनोद तावडे यांना मोदी आणि शहा यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जाते. पक्ष स्रेष्ठींनी त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवली ती त्यांनी यश्वस्वीपणे पार पाडून दाखवली आहे. इंडिया आघाडीबरोबर गेलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा NDA सोबत आणण्यात विनोद तावडे यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळं त्यांचं वजन आणखीनच वाढलं.
२०२३ मध्ये विरोधकानी लोकसभेच्या तयारीसाठी इंडिया आघाडीची स्थापना केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या आघाडीला साकारण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होते. नितीश कुमार यांना अपेक्षा होती की त्यांना इंडिया आघाडीच संयोजक पद मिळेल आणि ते पुढे सत्ता आली तर पंतप्रधान होतील. पण जुलै मध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत त्यांचा अपेक्षाभंग झाला. ते नाराज होऊन पाटण्याला परत आले. नितीश कुमार यांच्या नाराजीला भडाग्नी दिला तो विनोद तावडे यांनी. नितीश कुमार यांची समजूत काढून लोकसभेच्या तोंडावर इंडिया आघाडी खिळखिळी करण्याची संधी तावडे यांनी गमावली नाही. २०२४ उजाडता उजाडता त्यांनी नितीश कुमार यांना फोडलं. जानेवारी महिन्यात पलटी मारून नितीश कुमार एनडीए मध्ये सामील झाले.आणि विनोद तावडे यांची मोदींचा संकटमोचक म्हणून देशभरात चर्चा झाली..तिकीट वाटप असो की पक्ष फोडाफोडी विनोद तावडे यांच्या शब्दाला भाजपमध्ये वजन आलं. पक्षाचे महासचिव म्हणून प्रेस कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान मोदींचं वाराणसी मधून तिकीट विनोद तावडे यांनी जाहीर केले. मोदींच्या सभा, रॅली, प्रचार याचं नियोजन तावडे यांनी केलं. एकनाथ खडसे यांच्या घरवापसी मागे देखील विनोद तावडे यांचाच हात असल्याचं बोललं जातं.
एकेकाळी ज्या विनोद तावडे यांचं राजकीय करिअर संपलं, पक्षाने पंख छाटले असं बोललं गेलं त्याच विनोद तावडेंनी आज फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. 2019 मध्ये मुंबईतील बोरिवली विधानसभा मतदारसंघातून पक्षाने त्यांचं तिकीट कापलं होतं..अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सरचिटणीसपदापासून ते मुंबई अध्यक्ष आणि विधान परिषदेचे नेतेपदापर्यंत त्यांनी पक्षात अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या.असं असतानाही फडणवीस सरकारच्या कार्यकाळात त्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील मंत्रिपद देण्यात आलं होतं.. पक्षाने डावल्यानंतर त्यांनी शांत आणि संयमी भूमिका ठेवली. तावडे हे संघाच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत. त्यांनी संयम ठेवला आणि योग्य वेळी वरिष्ठ नेत्यांशी संबंध प्रस्थापित करून राष्ट्रीय राजकारणात उडी घेतली. दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या. राष्ट्रीय सरचिटणीस पदानंतर त्यांच्या जबाबदारीत पुन्हा वाढ करण्यात आली. हरीयाणानंतर बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ती त्यांनी यशस्वी पार पाडली. पक्षाला आपल्या कामाचे रिझल्ट दिले..विश्वास कमावला आणि आता त्याचंच फलित म्हणून की काय भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अध्यक्ष म्हणून विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.. भाजपाने त्यांना हा पदभार दिल्यास या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी चांगला संदेश जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे महाराष्ट्रातील खराब प्रदर्शन लक्षात घेता, हा निर्णय फायदेशीर ठरू शकतो. आता भाजप स्रेष्ठी काय निर्णय घेतात हे लवकरच स्पष्ट होईल.